रत्नागिरी-वाळू उत्खनन प्रकरणी ३५ लाखाच्या मशीन जप्त

रत्नागिरी-वाळू उत्खनन प्रकरणी ३५ लाखाच्या मशीन जप्त

Published on

संगमेश्‍वरला वाळू उत्खननावर कारवाई
जिल्हाधिकारी मनुज जिंदल ः ३५ लाखांची यंत्रणा जप्त; तिघांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून संगमेश्वरमध्ये कारवाई करून सुमारे ३५ लाखांची उपसा यंत्रणा जप्त केली आहे. तसेच, ३ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कांदळवनाची तोड झाल्याची तक्रार असल्याने वन विभागालाही त्याबाबत पत्र दिले आहे. बेकायदेशीर वाळू उपसा थांबला पाहिजे, अशी ताकीद तहसीलदारांना दिली आहे. यापुढे नियमबाह्य वाळू उपशाबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही, कठोर कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी वाळू माफियांना दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वाळू लिलावाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधीचा महसूल मिळतो. बदलत्या वाळू धोरणाचा लिलाव प्रक्रियेला फटका बसला आहे. आता तीन खाड्यांमधील वाळू लिलावाच्या काही गटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे; परंतु अजूनही काही गटांचा लिलाव झालेला नाही. यामुळे प्रशासनाला महसुलाची चिंता आहे, अशी स्थिती असताना जिल्ह्यात काही ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामध्ये संगमेश्वर, करजुवे, रत्नागिरी पांढरा समुद्र आदी ठिकाणच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या आहेत. त्यानुसार संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे होणाऱ्या बेकायदेशीर आणि बेसुमार वाळू उपशाबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, ‘संगमेश्वरमध्ये होणाऱ्‍या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत तक्रार आल्यानंतर तत्काळ कारवाई केली आहे. या कारवाईत मशीनसह सुमारे ३५ लाखांचे साहित्य जप्त केले आहे. ३ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे बेकायेदशीर वाळू उपसा होऊ नये, यासाठी तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत. भविष्यात अशा प्रकारे बेकायदेशीर वाळू उपसाबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही.’
काही राजकीय लोकांचा वरदहस्त असल्याचे पत्रकारांनी विचारले. यावर श्री. जिंदल म्हणाले, ‘आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. माझे उद्दिष्ट सरळ आहे. बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याचे दिसल्यास कारवाई होणार.’

पांढरा समुद्रावरील
उपशावरही होणार कारवाई
रत्नागिरीतील पांढरा समुद्र येथे बेकायदेशीर पांढऱ्या वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. शासनाचीच ही वाळू काही लोक चोरून विकत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘तसे असल्यास त्याची माहिती घेऊन तत्काळ कारवाई केली जाईल. अशा बेकायेदशीर वाळू उपशाबाबत कोणालाही काही माहिती असल्यास सांगा, यावर तत्काळ कारवाई होईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com