कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण १०० टक्के पूर्ण

कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण १०० टक्के पूर्ण

Published on

- rat१९p१३.jpg-
25O11791
कोकण रेल्वे

कोकण रेल्वेने विद्युतीकरणातून गाठली नवी उंची
मार्गावरील शंभर टक्के काम पूर्ण ; अभियांत्रिकीचा अजोड नमुना, रोहा-वीर दुहेरीकरण पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : भारतीय रेल्वेचा कणा मानल्या जाणाऱ्या कोकण रेल्वेने आपल्या ७३९ किलोमीटरच्या मार्गावर अभियांत्रिकीचे अजोड नमुने सादर करत प्रवासी सेवा आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती केली आहे. रोहा ते ठोकूरदरम्यान पसरलेल्या या रेल्वेमार्गावरील विद्युतीकरण १०० टक्के पूर्ण झाले आहे. आगामी काळात प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपयांचे नवीन प्रकल्प राबवले जात असल्याची माहिती ‘कोरे’ प्रशासनाकडून देण्यात आली.
कोकण रेल्वेचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक मानला जातो. या मार्गाचा ११.४५ टक्के भाग हा बोगद्यातून जातो. मार्गावर एकूण ९१ बोगदे एकूण लांबी ८४.५० किमी आणि १ हजार ८९१ पूल आहेत. रेल्वेने आपली गाड्यांची वहनक्षमता वाढवण्यासाठी रोहा-वीर ४७ किलोमीटर आणि मडगाव-माजोर्डा आठ किलोमीटरदरम्यान दुहेरीकरणाचे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्यामुळे गाड्यांचा क्रॉसिंगसाठी लागणारा वेळ वाचण्यास मदत होईल. विशेष गाड्या आणि नवीन सेवा प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन २०२४-२५ या वर्षात कोकण रेल्वेने विक्रमी विशेष गाड्या चालवल्या आहेत. त्यामध्ये गणपती उत्सवासाठी ३०४, तर उन्हाळी सुटयांसाठी १७८ विशेष फेऱ्यांचा समावेश आहे. पुढील वर्षी गणपती उत्सवात ३८१ गाड्या सोडण्याचे नियोजन आत्तापासूनच करण्यात आले आहे. मुंबई-मडगाव आणि मंगळुरू-मडगाव ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमुळे प्रवासाचा वेग वाढला असून, मडगाव-वांद्रे आणि सिकंदराबाद-वास्को यांसारख्या नवीन सेवांमुळे राज्यांतर्गत ‘कनेक्टिव्हिटी’ अधिक भक्कम झाली आहे. रेल्वेस्थानकांवर डिजी-लॉकर, वेलनेस झोन आणि ‘एक स्टेशन एक उत्पादन’ उपक्रमांतर्गत स्थानिक हस्तकलेच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.

चौकट
तीन वर्षांत ११.६० कोटींची कामे
‘कोरे’ने मालवाहतुकीतून आर्थिक सक्षमता कोकण रेल्वे केवळ प्रवाशांपुरती मर्यादित न राहता मालवाहतुकीतही मोठी मजल मारत आहे. बल्ली येथील ‘मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क’ आणि वेर्णा, इंदापूर, उडुपी येथे अत्याधुनिक वखार सुविधा निर्माण केल्यामुळे मालवाहतूक सोपी झाली आहे. आगामी तीन वर्षांत ११.६० कोटी रुपये खर्चून स्थानकांवर लिफ्ट, बायो-टॉयलेट्स आणि प्लॅटफॉर्म शेल्टरची कामे पूर्ण केली जाणार आहेत.
---
आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव
१५ हजार कोटींच्या प्रकल्पांची जबाबदारी कोकण रेल्वेचा दबदबा आता केवळ कोकणपुरता मर्यादित नसून, राष्ट्रीय स्तरावर पसरला आहे. सध्या कंपनीकडे १५ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प असून, यामध्ये जगातील सर्वात उंच ‘चिनाब पूल’ आणि भारतातील पहिला केबल-स्टेड ‘अंजी खाद’ पूल यांसारख्या ऐतिहासिक प्रकल्पांचा समावेश आहे. या उत्कृष्ट कामगिरीसाठी कोकण रेल्वेला नॅशनल अॅवॉर्ड फॉर एक्सलन्स इन सह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com