क्वारी, क्रशरविरोधात उद्या वाफोलीत बैठक

क्वारी, क्रशरविरोधात उद्या वाफोलीत बैठक

Published on

क्वारी, क्रशरविरोधात
उद्या वाफोलीत बैठक
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १९ ः वाफोली-विलवडे परिसरातील सुरू असलेल्या क्वारी व क्रशरच्या विरोधात रविवारी (ता. २१) दुपारी चार वाजता वाफोली ग्रामस्थांची तातडीची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक येथील सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांच्या निवासस्थानी होणार आहे.
वाफोली-विलवडे येथील क्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे वाफोली गावातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले असून, नागरिकांच्या घरांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. वाफोली गावाला येथील बागायतींसाठी वाफोली धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सातत्याने होणाऱ्या जोरदार ब्लास्टिंगमुळे या धरणालाही तडे जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात धरण फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास ग्रामस्थांनी कष्टाने उभ्या केलेल्या बागायती शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दिवस-रात्र सुरू असलेल्या क्रशरमुळे परिसरात वायू प्रदूषण वाढले असून, सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या प्रदूषणाच्या सतत संपर्कामुळे नागरिकांना श्वसनासंबंधी आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. काळ्या दगडाची वाहतूकही वाफोली गावातून मोठ्या प्रमाणात होत आहे. ओव्हरलोड डंपर भरधाव वेगाने धावत असून, अनेक वेळा चालक मोबाईलवर बोलत वाहन चालवित असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. यापूर्वीही यामुळे अपघात घडले असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. या सर्व गलथान कारभाराला आळा घालण्यासाठी वाफोली गावातील ग्रामस्थ विनीत गवस व गुणेश गवस यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊन लढा उभारणार आहेत. परिसरातील निसर्गाचा ऱ्हास थांबवणे, अपघात रोखणे तसेच निसर्ग, शेती व बागायतींचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विनीत गवस यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com