गुहागर-विजापूर मार्गावरील दुरुस्तीचे काम सुरू
गुहागर-विजापूर महामार्गावरील
रखडलेले दुरुस्तीचे काम सुरू
गुहागर ः गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहर ते शासकीय विश्रामगृहादरम्यान शिल्लक राहिलेल्या डांबरीकरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. या कामासाठी दोन कोटींचा निधी मिळाला आहे. गेली अनेक वर्षे हे काम रखडले होते. अनेक वर्षे या रस्त्यावरून वाहने चालवताना वाहनचालक तसेच प्रवासी व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गुहागर शहर तसेच गुहागर तालुकावासियांच्यावतीने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनाही निवेदन दिले होते. अखेर पालकमंत्र्यांनी यासाठी निधी दिला. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. दुरुस्तीसाठी आणि बाजारपेठ नाका येथे रस्ता रुंदीकरणासाठी गुहागर शहरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक परचुरे तसेच सर्व सहकारी व गुहागरवासीय यांनी दोन ते तीनवेळा उपोषणाचा मार्ग पत्करला होता.
डॉ. अतुल ढगे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
रत्नागिरी : मानसिक आणि लैंगिक आरोग्य या महत्त्वपूर्ण; पण संवेदनशील क्षेत्रात दीर्घकाळ सातत्याने जनजागृती, उपचार, प्रशिक्षण आणि समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल माईंडकेअर हॉस्पिटलचे संस्थापक आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ व लैंगिकतज्ज्ञ डॉ. अतुल ढगे यांना ग्लोबल लीडर इन मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ अवेरनेस २०२५ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान दुबई येथे झाला. डॉ. ढगे गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक आणि लैंगिक आरोग्य या दोन्ही क्षेत्रात सामाजिक संवेदना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकाभिमुखदृष्टीने कार्यरत आहेत. या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल बोलताना ते म्हणाले, ही जागतिक मान्यता माझ्या रुग्णांची, माईंडकेअर टीमची आणि समाजासाठी मानसिक व लैंगिक आरोग्यसेवेत विश्वास ठेवणाऱ्या सर्वांची आहे. या नव्या सन्मानानंतर या कामाबाबत माझी जबाबदारी वाढली आहे व वचनबद्धता आणखी दृढ झाली आहे.

