सिंधुदुर्गात नव्याने १७ कुष्ठरोगी
swt1916.jpg
11877
सिंधुदुर्गनगरीः येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी.
सिंधुदुर्गात नव्याने १७ कुष्ठरोगी
शोध मोहिमः मालवणात सर्वाधिक रुग्णसंख्या
ओरोस, ता. १९ः शासनाच्या निर्देशानुसार १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग शोध मोहिमेत जिल्ह्यात नव्याने १७ कुष्ठरोगी सापडले आहेत. यामध्ये सहा सांसर्गिक आणि अकरा असांसर्गिक रुग्णांचा समावेश आहे. यात सर्वाधिक संख्या मालवण तालुक्यात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी डॉ. धुरी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी निलेश मठकर, कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. सतीश गुजलवार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश करतसकर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत सौदी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जिल्हा समन्वयक डॉ. प्रवीण गोरुले आदी उपस्थित होते.
डॉ. धुरी म्हणाल्या, ‘‘वर्षातून एकवेळ कुष्ठरोग शोध मोहीम राबविली जाते. त्यानुसार १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेत सहा लाख ९२ हजार ३६९ लोकांचा सर्व्हे करण्यात आला. त्यातील ६ हजार ८४८ लोक संशयित आढळले होते. त्या सर्वांचे अंतिम निदान केले असता १७ लोकांना कुष्ठरोग झाल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांना उपचाराखाली आणण्यात आले आहे. यासाठी गावोगावी आशा सेविकांनी प्रामाणिक व अहोरात्र काम केले. त्यामुळे ही शोध मोहीम यशस्वी झाली.’’
त्या पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात सध्या कर्करोग शोध मोहीम व्हॅन आलेली आहे. १५ डिसेंबरला ती दाखल झाली असून १५ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे. याचे तालुकानिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या व्हॅनमध्ये दातांचे निदान सुद्धा केले जाते. यात कर्करोग आणि दंत चिकित्सक तज्ञ उपस्थित असतात. यापूर्वी सुद्धा जिल्ह्यात ही व्हॅन येऊन गेली आहे. त्यावेळी कर्करोग निदान झालेल्या सर्व संशयितांना उपचाराखाली आणलेले आहे. जिल्ह्यात सध्या १७४ कर्करोग रुग्ण आहेत. हे सर्व उपचार घेत आहेत. यामध्ये तोंडाचे सर्वाधिक ७० रुग्ण आहेत. स्तनाचे ६७ तर गर्भाशयाचे ३७ रुग्ण आहेत.’’
शासनाने आता क्षयरोग हा आजार अधिसूचित केला आहे. त्यामुळे या आजाराचा रुग्ण खाजगी रुग्णालयात निष्पन्न झाला तरी त्यांना शासनाला कळविणे बंधनकारक आहे. यामुळे क्षयरोग आजार झालेल्या रुग्णांवर तत्काळ व शासकीय उपचार करणे शक्य होणार आहे. यावर्षी जिल्ह्यात नव्याने १७ क्षयरोग रुग्ण आढळले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत. तसेच या आढळलेल्या रुग्णांच्या सहवासात असलेल्या ४३१ व्यक्तींना क्षयरोग आजाराच्या औषधाची पहिली मात्रा देण्यात आली आहे, असेही यावेळी डॉ. धुरी यांनी सांगितले.
शासनाच्या निर्देशानुसार हत्तीरोगाचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार ६ हजार ४२१ व्यक्तींचा सर्व्हे करण्यात आला. यातील आठ जणांना हत्तीरोगाची बाधा आढळून आली. यातील चार रुग्ण उत्तर प्रदेश राज्यातील, दोन रुग्ण बिहार मधील, एक रुग्ण मध्य प्रदेश मधील तर एक रुग्ण जिल्ह्यातील आहे. तसेच ६६ जणांवर उपचार केल्याने ते हत्तीरोग मुक्त झाले आहेत. याशिवाय मलेरियाचे १४३ रुग्ण, डेंगीचे १२५, माकडतापचे चार आणि चिकनगुणीयाचे ४५ रुग्ण सापडले आहेत. लेप्टोचा यावर्षी एकही रुग्ण आढळलेला नाही.
चौकट
‘आयुष्यमान’मध्ये सिंधुदुर्ग अव्वल
राज्याच्या महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत आणि केंद्राच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आणि वितरण करण्यात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. उद्दिष्टांच्या ६२ टक्के काम झाले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अजून दीड लाख कार्ड काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ४ लाख ९३ हजार ४८१ जणांची कार्ड काढली आहेत. तसेच ७० वर्षावरील व्यक्तींसाठी राबविण्यात येत असलेल्या वय वंदना योजनेत ३८ टक्के काम झाले आहे. २१ हजार ३९४ जणांना कार्ड वाटप करण्यात आली आहेत. जिल्ह्यात या योजनेचा ५ हजार ९८९ जणांनी लाभ घेतला आहे. १३५६ आजारांवर या अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात येतात, असे यावेळी डॉ. धुरी यांनी सांगितले.
चौकट
कुष्ठरोग मिळालेल्या रुग्णांचा तक्ता
तालुका*रुग्ण
मालवण*६
सावंतवाडी*४
कुडाळ*३
कणकवली*२
देवगड*१
वेंगुर्ले*१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

