

कुडाळ येथे आज
‘रौप्य महोत्सव’
कुडाळ ः येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा उद्या (ता. २१) आयोजित केला आहे. यावेळी महाविद्यालयाच्या २००० मधील बॅचच्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण प्रवासाला २५ वर्षे पूर्ण होत असल्याने रौप्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने बॅचच्या आठवणी, अनुभव आणि यशोगाथा साजऱ्या करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी आयोजन समितीच्या समन्वयक प्रा. काजल मातोंडकर यांच्याशी संपर्क साधावा. हा मेळावा सकाळी दहाला एकनाथ महाविद्यालयाच्या ठाकूर सभागृहात होणार आहे. हा मेळावा माजी विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या मेळाव्यास महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी केले आहे.
....................
कुणकेरी शाळेत
राष्ट्रीय पक्षी दिन
ओटवणे ः जिल्हा परिषद शाळा कुणकेरी क्र. ३ येथे राष्ट्रीय पक्षी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या स्वराज्य सौदामिनी ताराराणी बुलबुल पथक तसेच स्वराज्य रक्षक संभाजीराजे कब पथक यांच्यामार्फत हा अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी दाणे व पाणी ठेवत पक्षी संवर्धनाचा अनोखा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या पक्ष्यांची चित्रे रेखाटली. पक्षी संवर्धनाच्या घोषणा देत प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती केली. शाळेच्या कब व बुलबुल पथकाच्या प्रमुख फ्लॉक लिडर निता सावंत यांनी मुख्याध्यापक मिंगेल मान्येकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा विनया सावंत तसेच सर्व पालकांचे विशेष सहकार्य लाभले. कोलगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख भावना गावडे व ग्रामस्थांनी शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
---
कुडाळात आज
सहविचार सभा
कुडाळ ः कणकवली-कासार्डे येथील १९ वर्षीय कस्तुरी पाताडे या युवतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी व डॉक्टरांच्या कारभारासंदर्भात उद्या (ता. २१) सायंकाळी चारला शहरातील गणपती मंदिर (दिवाणी न्यायालयाच्या नजीक) येथे कुडाळ शहरातील सजग नागरिकांची बैठक आयोजित केली आहे. कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये युवतीवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अधिक उपचारादरम्यान कोल्हापूर येथे तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नागवेकर हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून मृताच्या नातेवाईकांना दिलेली वागणूक, त्यानंतर झालेला जनउद्रेक, तोडफोडीविरोधात खासगी डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवून केलेला निषेध या सर्व विषयांवर या बैठकीत विचारविनिमय होणार आहे.
......................
निवडणूक प्रभारीपदी
प्रमोत जठार नियुक्त
कणकवली ः महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष ‘अॅक्शन मोड’वर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी कल्याण महानगरपालिका निवडणुकीकरिता भाजपकडून माजी आमदार प्रमोद जठार यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या संघटन कौशल्याने भाजपचे जास्तीत-जास्त उमेदवार निवडून येण्याकरिता परिश्रम घ्या, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जठार यांना दिलेल्या या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
........................
तारकर्लीत आज
महापुरुष जत्रोत्सव
मालवण ः तारकर्ली येथील महापुरुष देवालयाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. २१) होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात रात्री ११.३० वाजता पार्सेकर दशवातर नाट्यमंडळ, वेंगुर्ले यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवात सहभागी होऊन श्रीदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तारकर्ली ग्रामस्थांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.