सावंतवाडी सत्तासंघर्षाचा आज फैसला

सावंतवाडी सत्तासंघर्षाचा आज फैसला

Published on

12001
सावंतवाडी : येथील तहसील कार्यालयामध्ये मतमोजणीसाठी उभारलेली व्यवस्था.
12002
सावंतवाडी ः पोलिस बंदोबस्ताची पाहणी करताना सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण.

सावंतवाडी सत्तासंघर्षाचा आज फैसला

निकालाबाबत उत्कंठा; मतमोजणीची तयारी पूर्ण, सकाळी ११ पर्यंत चित्र स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या (ता. २१) सकाळी दहाला तहसीलदार कार्यालयात पार पडणार आहे. यासाठी आवश्यक तयारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केली असून, साधारण ११ वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये पाहायला मिळालेली चुरस तर ठाकरे शिवसेनेने दोन्ही पक्षांना दिलेले आव्हान पाहता उद्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार आणि नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. होमपीच असलेल्या आमदार दीपक केसरकर यांच्यासाठी उद्याचा निकाल प्रतिष्ठेचा ठरणार आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेसाठी ३ डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीदरम्यान निर्माण झालेले वातावरण भाजप-शिंदे शिवसेना यांनी एकमेकांसमोर निर्माण केलेले आव्हान आणि त्याच तोडीने ठाकरे शिवसेना, काँग्रेस यांनी निवडणुकीमध्ये निर्माण केलेले वातावरण पाहता यावेळचा निकाल हा अनपेक्षित असा पाहायला मिळणार असल्याचे जनतेचे मत आहे. निवडणुकीदरम्यान धनशक्तीचा झालेला वापर पाहता भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यामध्येच खरी लढत पाहायला मिळणार असल्याचेही काहींचे मत आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून येथील संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले तर शिंदे शिवसेनेकडून अॅड. नीता सावंत-भोसले रिंगणात उभ्या होत्या. ठाकरे शिवसेनेकडून सीमा मठकर तर काँग्रेसकडून साक्षी वंजारी पक्षाच्या चिन्हावर, तर माजी उपनगराध्यक्ष असलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर या अपक्ष उमेदवार होत्या. प्रत्येकाकडून सावंतवाडी शहरामध्ये प्रचारावर जोरदार भर दिला होता. सावंतवाडी शहरातील समस्या त्याचबरोबर विकासाचा अजेंडा घेऊन प्रत्येकाकडून घरोघरी प्रचार करण्यात आला. नगरसेवकसह नगराध्यक्षपदासाठी भाजपा आणि शिंदे शिवसेनेसोबतच ठाकरे गटाकडूनही नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आली होती. प्रत्येक नगरसेवकाच्या उमेदवाराने ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदानावर भर दिला होता.
सावंतवाडी शहरातील आमदार दीपक केसरकर यांचे प्राबल्य लक्षात घेता ही निवडणूक त्यांना काहीशी सोपी जाईल, असे वाटत असतानाच भाजपकडून एक प्रकारे या निवडणुकीमध्ये आव्हान उभे करण्यात आले. पालकमंत्री नीतेश राणे यांनी जातीनिशी या निवडणुकीमध्ये लक्ष घातल्याने ही निवडणूक रंगतदार बनली होती. भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्येच कडवी लढत पाहायला मिळाली; मात्र ठाकरे गटानेही त्याच दमाने प्रचार आणि ताकद लावल्याने सीमा मठकर यांनाही लोकांकडून चांगली पसंती मिळाली. त्यामुळे उद्याचा निकाल कसा असेल, हे सांगणे येथील मतदारांना कठीण बनले आहे.
सर्वच पक्षांकडून आपलाच नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे; मात्र जनतेने नेमके कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले, हे उद्या ११ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. एकूणच नगराध्यक्षपद व नगरसेवकपदांच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. आमदार केसरकर यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे यांच्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेचा निकाल प्रतिष्ठेचा ठरणार आहे. कित्येक वर्षे या नगरपरिषदेवर आमदार केसरकर यांची सत्ता राहिली आहे. गतवेळी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने सत्ता खेचून आणण्यात यश मिळविले होते; परंतु आताच पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या तावडीतून सत्ता खेचून आणण्यात श्री. केसरकर यशस्वी होणार की, पुन्हा एकदा नगरपरिषदेवर भाजपचे कमळ फुलविण्यास पालकमंत्री राणे यशस्वी होतात, हे उद्याच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे.
----
दोन फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी
सकाळी दहाला मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी साडेनऊला उमेदवारांसमोर स्ट्राँग रुम खुला करण्यात येणार आहे. त्यानंतर मतपेट्या मतमोजणी कक्षात आणून दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीमध्ये पाच प्रभागातील महिला उमेदवारांची मतमोजणी, त्यानंतर लगेचच पुरुष उमेदवारांची मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या फेरीमध्ये सहा ते दहा अशा उर्वरित पाच प्रभागांतील मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला महिला उमेदवार आणि नंतर पुरुष उमेदवार अशी ही मतमोजणी होणार आहे.
---
कडक बंदोबस्त, रस्ता बंद!
साधारण ११ वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार असून कडक पोलिस बंदोबस्त असेल. यासाठी तहसील कार्यालय ते टोपीवाला स्मारक तंत्रनिकेतन विद्यालयपर्यंतचा रस्ता, तहसील कार्यालय ते बी. एस. पांदेकर कॉलेजकडून बांदा नाक्यापर्यंत, तहसील कार्यालय ते शिरोडा रस्ता (ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्रापर्यंत), तहसील कार्यालय ते मिलाग्रिस हायस्कूलपर्यंतचा रस्ता मतमोजणी संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com