पारपोलीचे अर्थकारण पर्यटनातून बदलेल

पारपोलीचे अर्थकारण पर्यटनातून बदलेल

Published on

12008

पारपोलीचे अर्थकारण पर्यटनातून बदलेल

नीतेश राणे ः ‘फुलपाखरू’ महोत्सवाचे शानदार उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा, ही माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची संकल्पना होती. केवळ संकल्पना मांडून न थांबता त्यांनी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करून या ठिकाणी अनेक जागतिक दर्जाचे प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न केले. याच पार्श्वभूमीवर ‘सिंधुरत्न’ योजनेंतर्गत सुरू झालेल्या पारपोली येथील ट्री-हाऊस आणि फुलपाखरू महोत्सवाच्या माध्यमातून या भागाचा कायापालट होणार आहे. येथील अर्थकारण बदलेल व अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्हा जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवेल, असा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.

निसर्गसंपन्न पारपोली (ता. सावंतवाडी) येथे वन विभागातर्फे साकारलेल्या ‘ट्री-हाऊस’, भव्य स्वागत कमान आणि ‘पारपोली फुलपाखरू महोत्सवा’चा शानदार उद्‍घाटन सोहळा मंत्री राणे यांच्या हस्ते व माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी पालकमंत्री राणे बोलत होते. व्यासपीठावर उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, पारपोली सरपंच कृष्णा नाईक, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगरसेवक उदय नाईक, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, वैभव बोराटे, उपसरपंच संदेश गुरव, वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे उपस्थित होते.
राणे म्हणाले, ‘जिल्ह्याच्या विकासासाठी सिंधुरत्न योजनेतून अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारले आहेत. सद्य:स्थितीत ही योजना थांबली असली तरीही ती पुन्हा सुरू होण्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री व कोकणातील मंत्री या नात्याने विशेष प्रयत्न करणार आहे. या योजनेतील काही प्रकल्प निधीअभावी थांबले असतील, तर त्या प्रकल्पांना पुन्हा गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे. स्थानिक सरपंच आणि ग्रामस्थांनी या परिसराच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना मांडाव्यात, त्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मोपा विमानतळामुळे पर्यटकांची मोठी संख्या या भागाकडे वळत आहे; मात्र पर्यटक सिंधुदुर्गात एक दिवस तर गोव्यात तीन दिवस थांबतात. जेव्हा पर्यटक तीन दिवस सिंधुदुर्गात आणि एक दिवस गोव्यात घालवेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्याचे अर्थकारण बदलेल.’

​जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या प्रश्नावर बोलताना राणे म्हणाले, ‘ओंकार हत्ती आता विध्वंस करू लागला आहे. त्यामुळे भविष्यात हत्तींपासून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून कायमस्वरुपी उपाययोजना केल्या जातील. ओंकारसाठी ‘वनतारा’ची टीमही दोनवेळा पाहणी करून गेली आहे. येत्या ४-५ वर्षांत या भागात भव्य प्राणी संग्रहालय उभारण्यासाठी वनमंत्र्यांना पत्र दिले असून, त्याचे काम प्रगतिपथावर आहे.’ यावेळी पर्यटनमित्र हेमंत ओगले, काका भिसे, निखिल कुलकर्णी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार झाला. तसेच ‘ट्री हाऊस’ची संकल्पना प्रत्यक्षात राबविणारे कृष्णा परब, बाळा डांगी, राजेश कविटकर, ठेकेदार रुपेंद्र पेड्डी, अरविंद सावंत यांचाही सन्मान करण्यात आला.
................
‘सिंधुरत्न’चे ध्येय पूर्ण होणार : केसरकर
संस्थान काळात पारपोली ते आंबोली अशी पायवाट होती. आताही आंबोली धबधबा ते पारपोली अशा येणाऱ्या पर्यटकांची व्यवस्था वनविभागाने केली आहे. आज पारपोली गाव फुलपाखरांचा गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे. येथील ग्रामस्थांनी निवास न्याहारी योजना सुरू केली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वनविभागाच्या माध्यमातून पर्यटकांना ने-आण करण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. तसेच भविष्यात ‘बॅटरी ऑपरेटेड’ वाहन उपलब्ध करून दिले जाईल. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून सिंधुरत्न योजनेतून जे रोजगार निर्मितीचे ध्येय ठेवले आहे, ते पूर्ण होईल. पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊन या गावाचा चेहरामोहरा बदलून जाईल, असा विश्वास सिंधुरत्न योजनेचे माजी अध्यक्ष, आमदार केसरकर यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com