गावठणवाडी मंडळाचे उपक्रम स्तुत्य
12848
गावठणवाडी मंडळाचे उपक्रम स्तुत्य
विक्रांत सावंत ः ओटवणेत गाव चव्हाटा महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २३ ः ‘गावठणवाडी कला, क्रीडा मंडळ गेली १२ वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रमांसह महोत्सवाचे आयोजन करताना स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत आहे, हे कौतुकास्पद आहे. मंडळाने सुसज्ज रंगमंच उभारून ग्रामीण भागातील मंडळांसमोर एक आदर्श ठेवला आहे. अशा उपक्रमशील मंडळांच्या नेहमी पाठीशी राहू,’ असे प्रतिपादन सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी केले.
ओटवणे गावठणवाडी कला, क्रीडा व मित्रमंडळ आयोजित गाव चव्हाटा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. सावंत बोलत होते. व्यासपीठावर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक दळवी, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, तिलारी पाटबंधारे सावंतवाडी उपविभागीय अभियंता संतोष कविटकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर, कृषी अधिकारी सुभदा कविटकर, गावप्रमुख रवींद्र गावकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, माजगाव माजी उपसरपंच संजय कानसे, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाबाजी गावकर, कवी कृष्णा देवळी, प्रसिद्ध निवेदक राजा सामंत, गायक मयूर गवळी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सगुण गावकर, मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, रमेश गावकर, वायरमन समीर सावंत, अमोल गावकर, नामदेव गावकर, दशावतारी कलाकार कांता मेस्त्री, विठ्ठल गावकर, नाना गावकर, सुनील मेस्त्री आदी उपस्थित होते.
मंडळाचे उपक्रम कौतुकास्पद असून मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची एकजूट आदर्शवत असल्याचे अशोक दळवी यांनी सांगितले. रवींद्र म्हापसेकर यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या मंडळाने विविध उपक्रमांतून एक वेगळी ओळख निर्माण केली, असे सांगत मंडळासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची शुभदा कविटकर यांनी ग्वाही दिली.
कार्यक्रमात विक्रांत सावंत, अशोक दळवी, संतोष कविटकर, शुभदा कविटकर, राजा सामंत यांचा सत्कार करण्यात आला. दहावीत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या तन्वी गावकर, साक्षी गावकर, रिया सावंत, तन्वी चंद्रकांत गावकर, तसेच कोकण विभागाच्या खो-खो संघात निवड झालेल्या अनुष्का गावकर यांचाही सत्कार केला.

