चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराने पालकांसह मान्यवरही मंत्रमुग्ध
12819
चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराने
पालकांसह मान्यवरही मंत्रमुग्ध
कुडाळ इंग्रजी शाळेचे स्नेहसंमेलन
कुडाळ, ता. २३ ः क. म. शि. प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी विविध नृत्याविष्कार सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक नृत्याला साजेशी वेशभूषा या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले.
शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन १९ व २० डिसेंबरला मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. यात १९ ला पूर्वप्राथमिक ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी उत्साहात झाले, तर २० ला पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. मुमताज शेख यांच्या हस्ते रंगमंचाचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच सरस्वतीच्या मूर्तीला पुष्पहार घालून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात केली. दुपारी स्नेहसंमेलनास प्रारंभ झाला. ‘गणेशवंदना’ने कार्यक्रमाची सुरुवात केली. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकार सादर केले. कोळीगीते, इंग्रजी गीते, देशभक्तिपर गीते, चित्रपटातील गाणी, देवाची गाणी या सर्व गाण्यांवर विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण केले. कोकणावर आधारित असलेल्या गाण्यांवर देखील नृत्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमास पालक व प्रेक्षकांचा टाळ्यांच्या गजरात भरभरून प्रतिसाद मिळाला. स्नेहसंमेलन सोहळा उत्साही, आनंददायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. सांताक्लॉजचा डान्स कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरला. सहाय्यक शिक्षिका वैशाली शेट्टी व पूर्वा राऊळ यांनी सूत्रसंचालन केले.

