तिरोडा शाळेच्या संघाचे क्रीडा महोत्सवात यश
12825
तिरोडा शाळेच्या संघाचे
क्रीडा महोत्सवात यश
आरोंदा, ता. २३ ः तालुकास्तरावरील बाल कला, क्रीडा महोत्सवात तिरोडा शाळा क्र. १ च्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या शाळेतील लवेश जाधव याने १०० मीटर धावणे व उंच उडी स्पर्धेत द्वितीय, तसेच मोठा गट समूहगीत गायन प्रथम, लहान गटात द्वितीय व निशांत मातोंडकर याने गोळा फेकमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ग्रामपंचायतीने शाळेचे अभिनंदन करून भेटवस्तू देत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक जनार्दन प्रभू, पदवीधर शिक्षक दीपक राऊळ, उपशिक्षिका संगीता राळकर व सीमा सामंत, पालक, ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
---
12824
डॉ. अमुल पावसकरांना
‘आश्रम पुरस्कार’ जाहीर
बांदा, ता. २३ ः सावंतवाडी येथील स्वरूप हॉस्पिटलचे संचालक व सुप्रसिद्ध जनरल सर्जन डॉ. अमुल पावसकर यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी कार्याची दखल घेत श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज पॅरामुर (तेलंगणा) आणि बांदा परिवारातर्फे देण्यात येणारा पहिला ‘आश्रम पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.
रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल व ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप असून १८ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता येथील स्वामी समर्थ हॉल येथे होणाऱ्या पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळ्यात डॉ. पावसकर यांना गौरविण्यात येणार आहे. डॉ. पावसकर हे ‘एफमास’, ‘एफएआयएस’,‘ एफआयएजेस’ पदवीधर असून ते ज्येष्ठ जनरल व मिनिमल ॲक्सेस सर्जन, जीआय एन्डोस्कोपिस्ट, तसेच ग्रामीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली एन्डोस्कोपी सुविधा सुरू करणारे शल्यचिकित्सक अशी त्यांची विशेष ओळख आहे. साहित्यिक व कलावंत म्हणूनही त्यांची ओळख आहे.

