बांद्यात शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन
12874
बांदा ः येथील पीएमश्री केंद्रशाळा बांदा क्रमांक १ येथे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी मान्यवर.
बांद्यात शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन
केंद्रशाळा क्र. १ चा उपक्रमः राष्ट्रीय गणित दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ः महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याच औचित्याने पीएमश्री केंद्रशाळा बांदा क्रमांक १ येथे चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन मार्गदर्शक विशाल मोहिते यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन उदय सावळ यांनी केले, तर प्रास्ताविक बांदा केंद्राचे केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनकार्याची माहिती देत त्यांच्या गणितातील योगदानावर प्रकाश टाकला. तसेच या कार्यशाळेमधून विद्यार्थ्यांना होणारा शैक्षणिक लाभ आणि अभ्यासक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
रामानुजन यांना लहानपणापासूनच गणिताची विशेष आवड होती. संख्या, अंक, प्रमेय याबद्दलची त्यांची ओढ आणि गणितातील विलक्षण प्रतिभेमुळे त्यांना ‘गणिताचे जादूगार’ म्हणून जगभर ओळख मिळाली. त्यांच्या या महान कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून घोषित केला आहे, अशी माहिती मुख्याध्यापक असनकर यांनी दिली.
कार्यशाळेत वयवारी, सरळ व्याज, फासा गणिती युक्त्या व क्लुप्त्यांवर सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने व एकाग्रतेने सहभाग घेतला. या कार्यक्रमास बांदा केंद्राचे माजी केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत यांचीही उपस्थिती लाभली. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उदय सावळ, रंगनाथ परब, अर्चना देसाई, फ्रांसिस फर्नांडिस, प्रसनजीत बोचे, मनीषा मोरे, कृपा कांबळे, शिल्पा मस्के, जागृती धुरी, सुप्रिया धामापूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

