चिपळूण-युवती शहर संघटक डॉ. सानिका टाकळेंचा राजीनामा
rat23p20.jpg-
12858
डॉ. सानिका टाकळे
----------
ठाकरे सेनेच्या युवती शहर संघटक
डॉ. सानिका टाकळेंचा राजीनामा
चिपळुणातील पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः चिपळूण पालिकेची निवडणूक संपताच ठाकरे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. युवती शहर संघटक डॉ. सानिका टाकळे यांनी पदासह पक्षाचा राजीनामा देत पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. स्थानिक पातळीवर पक्षाची सुरू असलेली कार्यपद्धती अत्यंत घातक आणि क्लेशदायक आहे. कार्यकर्त्यांना पुढे ढकलून वाऱ्यावर सोडून द्यायचे, ही पद्धत कार्यकर्त्यांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणारी आहे, अशा शब्दात डॉ. टाकळे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत ठाकरे सेनेमध्ये सरळसरळ उभे दोन गट पडले. एक गट आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली आघाडीत सहभागी झाला तर दुसऱ्या गटाने विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र निवडणूक लढवली. पक्षाची ताकद विभागली गेल्याने निवडणुकीत पानिपत झाले. आमदार भास्कर जाधव यांच्यामुळे पक्षाची किमान लाज तरी राखली गेली. त्यांच्या नेतृत्वाखाली ५ नगरसेवक निवडून आले. राऊत गटाचे सर्व उमेदवार पराभूत झाले.
डॉ. टाकळे या ठाकरे सेनेकडून नगरसेवकपदाची निवडणूक लढवत होत्या. त्यांना पराभव स्वीकारावा लागला. लगेच त्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे दिला आहे; मात्र राजीनामा देताना त्यांनी तीव्र शब्दात खंत व्यक्त केली आहे. चिपळूणमधील टाकळे कुटुंब नेहमीच पक्षाशी एकनिष्ठ असलेले कट्टर शिवसैनिक आहेत. आम्हाला स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास लाभला त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत. स्वतःच्या उद्योग व्यवसायाकडे दुर्लक्ष करून पक्षाचे अहोरात्र काम केले, असे स्पष्टपणे त्यांनी नमूद केले आहे.
चिपळुणात सध्या पक्षाची कार्यपद्धती ज्या पद्धतीने सुरू आहे ते अत्यंत घातक तसेच क्लेशदायक आहे. नेत्यांसाठी कार्यकर्त्यांनी काम करायचे आणि कार्यकर्त्यांची वेळ आली की, कार्यकर्त्यांना पुढे ढकलून वाऱ्यावर सोडून द्यायचे ही पद्धत पक्ष आणि कार्यकर्त्यांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणारे आहे. मी एक उच्चशिक्षित युवती पदाधिकारी म्हणून मला ते न पटणारे आहे. म्हणूनच मला टोकाचा निर्णय घ्यावा लागत आहे. माझे वडील समीर टाकळे यांनी देखील पक्षासाठी आपले उभे आयुष्य वेचले. स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून दिवसरात्र काम केले; परंतु त्यांचे राजकीय आयुष्यदेखील बरबाद झाले. नेहमी जर असेच होणार असेल तर मग पक्षात राहून काम तरी कशाला करायचे? त्यापेक्षा वेळीच बाजूला झालेले योग्य आहे. त्यामुळेच मी पद आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे, असे डॉ. टाकळे यांनी स्पष्ट केले आहे.

