प्लास्टिकचे ढिग; दुर्घंधीचे साम्राज्य
12862
प्लास्टिकचे ढीग; दुर्घंधीचे साम्राज्य
नांदगाव-मुस्लिमवाडी परिसराची दशा; नागरिक स्वयंशिस्त स्वीकारणार कधी?
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २३ ः येथील मुस्लिमवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला प्लास्टिक पिशव्या, सडलेल्या वस्तू व घरगुती कचऱ्याचे ढीग साचले असून, ही जागा जणू अनधिकृत डंपिंग ग्राउंडच बनली आहे. या ठिकाणी पसरलेली दुर्गंधी, अस्वच्छता आणि वाढत्या डासांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
दरवर्षी प्लास्टिक बंदीची घोषणा होते, जनजागृतीचे फलक लागतात. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती बदलण्याऐवजी अधिकच बिघडत आहे. दूध पिशवीसाठीसुद्धा ग्राहक प्लास्टिक पिशवीची मागणी करतात आणि दुकानदार ती देतच राहतात. परिणामी, प्लास्टिक कचरा रस्त्यांवर, नाल्यांत आणि मोकळ्या जागांमध्ये बिनदिक्कत फेकला जात आहे. शासन पातळीवरून बंदी, दंड आणि कारवाईच्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी नागरिकांकडूनच नियमांना बगल दिली जाते. प्रशासनावर बोट दाखवतानाच स्वतः किती जबाबदार आहोत, याचाही आत्मपरीक्षणाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे मुकी जनावरे जीव गमावत आहेत, नाले तुंबून पावसाळ्यात पाणी साचत आहे आणि पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. हे वास्तव माहीत असूनही प्लास्टिकचा बेफिकीर वापर आणि मनमानी कचरा टाकण्याची सवय सुटत नसल्याचे विदारक चित्र आहे. गुटखा, मटका, गोवा दारू आणि प्लास्टिक बंदीसाठी धाडी टाकल्या जातात, थरारक पाठलाग होतात, लाखो रुपयांचा माल जप्त होतो, दंड आकारला जातो आणि त्याचे फोटो वर्तमानपत्रांत झळकतात. मात्र, या कारवायांचा परिणाम किती काळ टिकतो? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. या साऱ्या समस्यांवर खऱ्या अर्थाने उपाय हवा असेल, तर केवळ दंड आणि धाडी नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्त स्वीकारणे हाच खरा मार्ग आहे; अन्यथा प्लास्टिकचा हा विळखा अधिक घट्ट होत जाणार आहे.
------------
कोट
नांदगाव-मुस्लिमवाडी परिसरात त्या जागेवर प्लास्टिक पिशव्यांबरोबर कुजलेला भाजीपाला, सडक्या वस्तू फेकल्या जात आहेत. त्यामुळे दुर्गंधीसह कुत्रे, गुरे मोठ्या प्रमाणात जमा होत असतात. त्यामुळे अपघाताचीही भीती आहे. यावर तातडीने योग्य उपाय योजावेत.
- मयुरी मोरये, रहिवाशी, नांदगाव-वाशीनवाडी
-------------
नांदगाव परिसरात अनेक ठिकाणी प्लास्टिक कचरा फेकण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत स्वच्छता अभियान राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येईल.
- इरफान साठविलकर, उपसरपंच, नांदगाव

