मुंडे महाविद्यालयात शिष्यवृत्ती पंधरवडा
मुंडे महाविद्यालयात
शिष्यवृत्ती पंधरवडा
मंडणगड ः येथील मुंडे महाविद्यालय व कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते महाविद्यालयातर्फे शिष्यवृत्ती विभागामार्फत ‘विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती विशेष पंधरवडा’ कार्यक्रम २८ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत राबवण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिष्यवृत्ती समिती समन्वयक डॉ. विनोद चव्हाण, प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, डॉ. शैलेश भैसारे, प्रा. तमन्ना मोरे, प्रा. अशोक कंठाळे, प्रा. प्राची कदम, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी उपस्थित होते. डॉ. विनोदकुमार चव्हाण यांनी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, हा या योजनांचा मुख्य उद्देश असून खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, दिव्यांग शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना, माजी सैनिक कल्याण योजना तसेच मुलींसाठी प्रगती शिष्यवृत्ती आदी योजनांची माहिती त्यांनी दिली.
विज्ञान प्रदर्शनात
नीलेश लोखंडेंचे यश
मंडणगड ः जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत ५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन लाटवण हायस्कूल येथे झाले. प्रदर्शनात तिडे-आदिवासी शाळेतील उपशिक्षक नीलेश लोखंडे यांनी ‘मनोरंजनात्मक गणितीय मॉडेल’ या विषयांतर्गत विविध अभिनव मॉडेल सादर केली. यामध्ये ‘संख्यांची गंमत’, ‘गणितीय टीव्ही’, ‘जादुई पाटी’ तसेच ‘मूळ संख्या शोधा’ ही शैक्षणिक व मनोरंजक मॉडेल प्रामुख्याने लक्षवेधी ठरली. प्रदर्शनात लोखंडे यांनी प्राथमिक शिक्षक गटातील मॉडेल प्रकारात तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांची जिल्हास्तरासाठी निवड करण्यात आली आहे. या मॉडेलचा उपयोग विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही होणार आहे.
-rat२३p४.jpg-
P२५O१२७८८
राजेश इंगळे
राजेश इंगळेंचे
निबंध स्पर्धेत यश
मंडणगड ः तालुक्यातील पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूलमधील विज्ञान विषयाचे शिक्षक राजेश इंगळे यांनी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, पुणे व विद्यासमिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हास्तरावर सात निवडक निबंधांमधून त्यांच्या निबंधाने पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला व राज्यस्तरासाठी त्यांची निवड करण्यात आली. राज्यस्तरावर ३६ स्पर्धकांमधून इंगळे यांच्या निबंधास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले. संस्थेचे अध्यक्ष भाई जगताप, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शालेय समिती आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
‘रिगल’ची रविवारी
शिष्यवृत्ती परीक्षा
चिपळूण ः जेईई-नीट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रिगल महाविद्यालयाने जाहीर केलेली शिष्यवृत्तीची परीक्षा रविवारी (ता. २८) सकाळी ११ वा. विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्याच दिवशी रिगल टॅलेंट हंट २०२५ या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण तालुक्यामध्ये रिगल महाविद्यालय कोंढे, गोडबोले क्लासेस मार्कंडी, अलोरे न्यू इंग्लिश स्कूल, सती चिंचघरी न्यू इंग्लिश स्कूल, लोटे येथील माध्यमिक विद्यालय, मार्कंडी येथील स्मित क्लासेस, रिगल प्री स्कूल, संगमेश्वर तालुक्यासाठी भाईशा घोसाळकर हायस्कूल, माध्यमिक विद्यालय करजुवे, न्यू इंग्लिश स्कूल देवरूख, न्यू इंग्लिश स्कूल कसबा तसेच रिगल कॉलेज महाड आणि रिगल कॉलेज श्रृंगारतळी आदी परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावयाची असेल त्यांनी सकाळी १०.३० वा. थेट परीक्षा केंद्रावर जाऊन ही परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेत उत्तम गुण मिळवून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे. तसेच या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला १ लाख रुपयांची वेगळी शिष्यवृत्ती मिळणार आहे.

