गुहागर-भाजप सेना युतीच्या एकीचा विजय
भाजप-सेना युतीच्या एकीचा विजय
गुहागर नगरपंचायत निवडणूक ; आगामी समीकरणांची नांदी
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २३ : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा आमदारांना असलेला विरोध अधोरेखित केला आहे. त्याचवेळी विधानसभेत उबाठा शिवसेनेला मिळालेली मते आजही हललेली नाहीत. एकला चलो रे च्या भूमिकेत राहून राष्ट्रवादीला काहीही साध्य करता येणार नाही. भाजप-सेना युतीने एकीने, उत्तम समन्वयाने आगामी निवडणुका लढवल्या तर मतदार यशाचे माप त्यांच्या झोळीत टाकतील, हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी निवडणूक अंगावर घेत यश मिळवल्याचेही या निवडणुकीतून दिसून आले आहे.
गुहागर नगरपंचायतीची स्थापना आमदार जाधव यांनी केली. त्यानंतरच्या केवळ एकाच निवडणुकीत गुहागरची एकहाती सत्ता आमदार जाधव यांना जनतेने दिली होती; मात्र मागील आणि आज झालेल्या निवडणुकीत आमदार जाधव आणि त्यांच्या पक्षाचा पराभव हेच राजकीय उद्दिष्ट होते. गतवेळी राजेश बेंडल यांनी शहरविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केला. या वेळी आघाडीच्याऐवजी भाजप-सेना युती होती. या दोन्ही वेळेला मतदारांच्या माध्यमातून हे राजकीय उद्दिष्ट साध्यही झाले. आमदार भास्कर जाधव यांचे नेतृत्व जनतेने नाकारले, हे जरी खरे असले तरी विधानसभा २०२४ मध्ये आमदार जाधव यांना मिळालेल्या मतांइतकीच (१२६६) मते या वेळीही उबाठा शिवसेनेला (११०५ नगराध्यक्षपदासाठी तर १११९ प्रभागनिहाय) मिळाली आहेत.
राजेश बेंडल यांना मिळालेल्या विधानसभेच्या मतांशी (२७५८) तुलना करायची झाली तर महायुतीची मते वाढली आहेत. नगरपंचायत निवडणुकीत भाजप-सेना युतीच्या उमेदवार नीता मालप यांना मिळालेली २१३५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता बागकर यांना मिळालेली ११३८ या दोन्हीची बेरीज ३२७३ होते. याचा अर्थ महायुतीच्या मतांमध्ये वाढ झाली आहे; परंतु जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणार नाही, असे विधान पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. त्याचा विचार केला तर भाजप-शिवसेनेला अपेक्षित मते मिळालेली नाहीत हे ही वास्तव स्वीकारावे लागेल.
गुहागर नगरपंचायतीच्या आजच्या निवडणुकीने पुन्हा एकदा गुहागरात भाजप-सेना युतीची राजकीय अपरिहार्यता समोर आली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये हे दोन पक्ष पुन्हा एकत्र आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला युतीच्या एकजुटीचा फटका बसू शकतो; मात्र त्यासाठी जागावाटपाचे गणित योग्य न्यायाने भाजप आणि शिवसेनेला सोडवावे लागेल. गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे समन्वय ठेवावा लागेल.
----
चौकट
राष्ट्रवादीची मते वाढली; पण नाराजीही दिसली
राष्ट्रवादीच्या मतात वाढ झाल्याचा दावा तालुकाध्यक्ष साहिल आरेकर करत आहेत. हा दावा खोटा आहे असे म्हणून चालणार नाही; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक उमेदवार, अन्य उमेदवारांबाबत असलेली नाराजी याचाही परिणाम मतांवर होत असतो. नगरपंचायतीसारख्या छोट्या निवडणुकीत तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांनी दाखवलेले धाडस निश्चितच कौतुकास्पद आहे; मात्र महायुती म्हणून राष्ट्रवादी लढली असती तर आणखी एका नगरसेवकाच्या विजयाचे दान पदरात पडले असते. त्यामुळे जिल्ह्यात महायुती नसली तरी गुहागर तालुक्यात महायुतीचे गणित जुळवण्यासाठी आरेकर यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे तरच केंद्र आणि राज्यात असलेल्या सत्तेचा फायदा राष्ट्रवादीला गुहागर तालुक्यात घेता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

