-संतांच्या संगतीने आयुष्य सार्थकी लावूया
संतांचे संगती .........लोगो
संतांच्या संगतीने आयुष्य
सार्थकी लावूया...
ज्याप्रमाणे आकाशातील चंद्रावर डाग दिसतात त्याप्रमाणे संतांच्या चारित्र्यावर कधीच कोणतेच डाग दिसत नाहीत म्हणून शीतल चंद्राप्रमाणे असणारे संत हे अलांच्छन चंद्र आहेत. ते स्वयंप्रकाशी आहेत म्हणजेच ते सूर्यासारखे आहेत का तर होय. ते नित्य प्रकाशित विश्वाचे कार्य चालवणाऱ्या सृष्टी नियंत्रक सूर्यासारखेच आहेत; पण दुपारी बाराचा सूर्य सर्वसामान्य माणसाला असह्य होतो, तसे ते नाहीत. त्यांचा कुणालाही ताप होत नाही म्हणून ते मार्तंड जे तापहीन असे आहेत.
- rat२४p६.jpg-
P25O13065
- धनंजय चितळे, चिपळूण
-----
चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन।
ते सर्वांही सदा सज्जन। सोयरे होतु।।
जगातील सर्व भाषातील काव्यांमध्ये चंद्राची उपमा अनेकवेळा दिली जाते. श्री ज्ञानेश्वर महाराजांनीसुद्धा या उपमेचा प्रयोग केला आहे; पण ते म्हणतात की, संत म्हणजे डाग नसलेले चंद्र आहेत. लांच्छन म्हणजे उणीव कमतरता किंवा डाग चंद्राच्या मर्यादा कोणत्या तर चंद्र हा परप्रकाशी आहे. संत हे स्वयंप्रकाशी आहेत. चंद्र पौर्णिमेला पूर्ण गोल असतो; पण पुढील पंधरवड्यात कमी कमी होत तो अमावस्येला दिसत नाही म्हणून चंद्राला क्षयरोगी असे म्हणतात. संतांचे तसे नाही. संत हे कायमच पूर्ण स्वरूपात असतात. ज्याप्रमाणे आकाशातील चंद्रावर डाग दिसतात त्याप्रमाणे संतांच्या चारित्र्यावर कधीच कोणतेच डाग दिसत नाहीत म्हणून शीतल चंद्राप्रमाणे असणारे संत हे अलांच्छन चंद्र आहेत. ते स्वयंप्रकाशी आहेत म्हणजेच ते सूर्यासारखे आहेत का तर होय. ते नित्य प्रकाशित विश्वाचे कार्य चालवणाऱ्या सृष्टी नियंत्रक सूर्यासारखेच आहेत; पण दुपारी बाराचा सूर्य सर्वसामान्य माणसाला असह्य होतो तसे ते नाहीत. त्यांचा कुणालाही ताप होत नाही म्हणून ते मार्तंड जे तापहीन असे आहेत.
थोडक्यात, आपल्या चांगल्या इच्छा पूर्ण करणारे, चिंतामुक्त करणारे मृदू आणि आनंददायी शब्दात बोलणारे चंद्राप्रमाणे शीतल असणारे आणि सूर्याप्रमाणे ज्ञानप्रकाशाने देदिप्यमान असणारे संत आमचे नित्य सोयरे होऊ देत. आता पुढच्या ओवीचा विचार करूया
किंबहुना सर्वसुखी। पूर्ण होऊनी तीही लोकी।
भजिजो आदिपुरुषी । अखंडित ।।
म्हणजेच ज्या कोणी आदिपुरुषाची अखंड भक्ती केली तो सर्व सुखी होऊदे. या ठिकाणी ‘सर्वसुख’ या शब्दाचा अर्थ प्रपंचातील सर्व सुखे असा नसून, श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्राप्रमाणे सर्व म्हणजे श्रीभगवंत, त्याच्या प्राप्तीने मिळणाऱ्या शाश्वत सुखाने तो माणूस सर्वार्थाने सुखी होऊदे, असा आहे. जो ग्रंथ वाचतो, त्याचे चिंतन करतो आणि त्याप्रमाणे जगण्याचा अभ्यास करतो त्याच्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथोपजीवी असा शब्दप्रयोग केला आहे. अशा ग्रंथोपजीवी माणसावर कोणतेही संकट येऊ नये त्याचा लौकिक आणि परलौकिक प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा, अशी मागणी श्री ज्ञानेश्वर महाराज करतात आणि ग्रंथोपजीवीये। विशेषी लोकी इये।
दृष्टादृष्ट विजये। होआवे जी।।
पसायदानातील श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या या सर्व अकरा मागण्या ऐकल्यानंतर त्यांचे श्री सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज त्यांना हा होईल दानपसावो असा आशीर्वाद देतात आणि तो ऐकून श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतःला सुखाची प्राप्ती झाली, असे कृतज्ञतेचे उद्गार काढतात.
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो। हा होईल दानपसावो।
येणे वरे ज्ञानदेवो। सुखिया झाला।।
वाचक हो, येथे पसायदान आणि आपली संतांचे संगती ही लेखमाला पूर्ण झाली. आता या वाचनानंतर आपण कोणता निश्चय करूया? तर येणाऱ्या वर्षांमध्ये आपण आपल्या कर्तव्याचे काटेकोर आचरण यावर भर देऊया, असे मला वाटते. आपल्याकडून खूप काही भव्यदिव्य झाले नाही तरी जगाचे नुकसान होणार नाही इतकी तरी काळजी आपण घेऊया आणि संतांच्या विचारांच्या संगतीने आपले आयुष्य सार्थकी लावूया. वर्षभराची सर्व लेखनसेवा कोकण भूमी निर्माता भगवान श्रीपरशुरामांच्या श्रीचरणी अर्पण करतो. तुम्हा वाचकांना मनापासून दंडवत करतो आणि लेखणीला विराम देतो.
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

