सर्वोत्कृष्ट क्रीडा सुविधांसाठी प्रयत्न
swt261.jpg
13534
बांदाः आंतर शालेय क्रीडा महोत्सवात बोलताना संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर. सोबत इतर मान्यवर.
सर्वोत्कृष्ट क्रीडा सुविधांसाठी प्रयत्न
डॉ. मिलिंद तोरसकरः बांदा खेमराज स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ः बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. उत्तम शिक्षणाबरोबरच क्रीडा विषयक सुविधा पुरवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही संस्था कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांनी दिली. आंतरशालेय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या भव्य पटांगणावर धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित दहा शाळांतील मुलांचा आंतरशालेय क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या अध्यक्षा कल्पना तोरसकर यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहणाने झाली. बांदा हायस्कूलच्या एनसीसी कॅडेटनी संचलन करत क्रीडाध्वज तसेच व्यासपीठावरील मान्यवरांना मानवंदना दिली. त्याचप्रमाणे बांदा, भेडशी, कुडासे, मडुरा, पिकुळे, डेगवे, कोलझर, असनिये, आयी या सहभागी शाळांच्या खेळाडूंनी सुद्धा मान्यवरांना मानवंदना दिली. राज्यस्तरावर किक बॉक्सिंगमध्ये दुसरा क्रमांक प्राप्त विद्यार्थी भावेश गवस आणि सानिया म्हसकर या गुणवंत खेळाडूंकडून मैदानात क्रीडाज्योत फिरवण्यात आली. खेमराजच्या विद्यार्थ्यांनी उद्घाटनपर रंगारंग कार्यक्रम सादर केला.
क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या रावी देसाई (सॉफ्टबॉल), सुचित्रा गोंधळी (सॉफ्टबॉल), अलिशा गावडे (हँडबॉल), भावेश गवस (किक बॉक्सिंग) तसेच सानिया म्हसकर (भालाफेक), प्रेरणा भोसले (बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, कराटे), आयुष वालावलकर (थाळी फेक/गोळा फेक) या विद्यार्थ्यांचा सत्कार मार्गदर्शक शिक्षक सोमनाथ गोंधळी, महेश नाईक, सुमेधा सावळ यांच्यासहित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना समन्वय समिती सहसचिव नंदकुमार नाईक यांनी केली. समन्वय समितीचे सदस्य अन्वर खान यांनी, अशा क्रीडा महोत्सवांचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा, असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे डॉ. दिलीप सावंत, डॉ. तुषार कासकर, डॉ. नारायण नाईक या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर संस्था कार्यकारिणी सदस्या तसेच शालेय समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, शालेय समन्वय समिती सहसचिव नंदकुमार नाईक, समन्वय समिती सदस्य अन्वर खान, सुनीता नाईक, डॉ. दिलीप सावंत, डॉ. तुषार कासकर, डॉ. नारायण नाईक, बांदा प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकिशोर नाईक, सर्व माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक, सचिन गवस, अमृता महाजन, पूनम मोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन रश्मी नाईक, रसिका भिसे यांनी केले. आभार प्रमोद सावंत यांनी मानले.
क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण बांदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या उपस्थितीत झाला. क्रीडा अहवाल वाचन सूर्यकांत सांगेलकर यांनी, सूत्रसंचालन रणधीर रणसिंग यांनी केले. मुख्याध्यापक एन. जी. नाईक यांनी आभार मानले.

