वेंगुर्लेत वाजपेयींना काव्यमय आदरांजली
13622
वेंगुर्लेत वाजपेयींना काव्यमय आदरांजली
जन्मशताब्दीनिमित्त उपक्रम; जिल्ह्यातील नामवंत कवींचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ ः भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त येथील बॅ. बी. आर. खर्डेकर महाविद्यालयात काव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील २५ पेक्षा अधिक नामवंत कवींनी अटलजींच्या तसेच राष्ट्रप्रेरक कवितांचे सादरीकरण करत कवितेच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण केली.
कवी म्हणून अटल बिहारी वाजपेयी हे अतिशय संवेदनशील, राष्ट्रप्रेमी व दूरदृष्टी असलेले साहित्यिक होते. त्यांच्या कवितांतून मानवी भावना, आशा, संघर्ष आणि देशभक्तीचे प्रभावी दर्शन घडते. ‘हार नहीं मानूंगा’ ही ओळ त्यांच्या आशावादी आणि सकारात्मक विचारसरणीचे प्रतीक ठरते. राजकारणातील कठोर वास्तव आणि काव्यातील हळवेपणा यांचा दुर्मीळ संगम त्यांच्या साहित्यिक योगदानात दिसून येतो, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
भारतीय संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास नगराध्यक्ष दिलीप गिरप, ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई, नगरसेविका अॅड. सुषमा खानोलकर, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सचिव डॉ. सचिन परुळेकर, कोकण संस्था अध्यक्ष दयानंद कुबल, समन्वयक शशिकांत कासले, स्वाती मांजरेकर, सत्यवान भगत उपस्थित होते. आनंदयात्री वाङमय मंडळ वेंगुर्ले, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग (तुळस) व बॅ. खर्डेकर कॉलेज यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी उत्स्फूर्त सहकार्य केले. सहभागी कवींना सन्मानित करण्यात आले. डॉ. परुळेकर यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत कासले यांनी आभार मानले.

