इंद्रधनु युवा महोत्सवात रंगला युवा वर्ग

इंद्रधनु युवा महोत्सवात रंगला युवा वर्ग

Published on

इंद्रधनू युवा महोत्सव तरुणाईचा जल्लोष
हेगशेट्ये महाविद्यालय ; विविध कार्यक्रमांसह स्पर्धांनी रंगत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : मिरजोळे एमआयडीसी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय आणि नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंद्रधनू युवा महोत्सवाची जल्लोषात सुरुवात झाली. या निमित्ताने विविध डेज आणि उपक्रमांनी रंगत आली आहे. ‘खाद्योत्सव’ आणि ‘बॉलिवूड डे’ने कार्यक्रमांना सुरुवात झाली. महाविद्यालयाचा जीएस ऋतिक चव्हाण याच्या नेतृत्वाखाली ‘विद्यार्थी परिषद हे डे’ज यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत.
यात क्रीडा महोत्सवाचे उद्‍घाटन नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, क्रीडाधिकारी गणेश जगताप, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य सुकुमार शिंदे, क्रीडा विभागप्रमुख प्रा. सुशील साळवी, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ताराचंद ढोबळे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून करण्यात आले. क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम, खो-खो, बुद्धिबळ, धावणे, रस्सीखेच, गोळाफेक आदी स्पर्धा पार पडल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषक देऊन गौरवण्यात आले.
इंद्रधनू युवा महोत्सवात ‘गॉगल डे, रोज डे, चॉकलेट डे, बॉलिवूड डे’ त्याचबरोबर पथनाट्य, फोटोग्राफी, मेहंदी, अंताक्षरी, फनीगेम, पाककला, रांगोळी, ढोलवादन, फेसपेंटिंग, कॉमेडी एक्स्प्रेस, सिंगिंग, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट आणि डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बॉलिवूड डे साजरा करताना हिंदी सिनेअभिनेता धर्मेंद्र यांना आदरांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र यांचे विविध पेहराव केले होते. मेहंदी, रिल मेकिंग आणि फोटोग्राफी या स्पर्धा झाल्या. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे १५ स्टॉल विविध पदार्थांनी सजले. खाद्योत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी गरमागरम, चमचमीत पदार्थावर ताव मारला. खाद्योत्सवाचे उद्घाटन डॉ. दिलीप पाखरे, अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आणि संचालिका सीमा हेगशेट्ये, ऋतुजा हेगशेट्ये, डॉ. अलिमियाँ परकार यांच्या हस्ते करण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com