ठाकरे शिवसेनेकडून विकासकामांना विरोध

ठाकरे शिवसेनेकडून विकासकामांना विरोध

Published on

13656

ठाकरे शिवसेनेकडून विकासकामांना विरोध

दोडामार्गात आरोप; शिंदे शिवसेनेकडून संघर्षाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २६ : तालुक्यात सुरू असलेल्या विकासात्मक कामांना विरोध करण्यासाठी एक संघटना कार्यरत झाली आहे. त्या संघटनेकडून दोडामार्ग-वीजघर रस्त्याचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न आठ दिवसांपासून सुरू आहे. कामाच्या ठिकाणी जाऊन कामगारांना मारहाण करणे, कामे अडविणे हे प्रकार विरोधी पक्षातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चालविल्याचा आरोप करत त्या प्रकाराचा शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत निषेध नोंदविला. विरोधकांनी हे प्रकार थांबविले नाहीत तर आम्ही सत्ताधारी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी दिला.
येथील तालुका शिवसेना संपर्क कार्यालयात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत गवस म्हणाले, ‘दोडामार्ग-वीजघर रस्ता मागील काही वर्षांपासून खड्डेमय, अरुंद आणि जीवघेणा होता. या रस्त्यामुळे अपघात होत असतानाही त्याची जबाबदारी घेण्याऐवजी विरोधकांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर बदनामीकारक टीका केली; मात्र, हाच रस्ता सुस्थितीत झाला तेव्हा कोणीच सत्ताधाऱ्यांचे आभार मानले नाहीत. वीजघर-दोडामार्ग रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, अशी मागील अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थांची मागणी होतो. ती सातत्याने पुढे केली जात होती. ग्रामस्थांची मागणी आणि विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी आमदार केसरकर यांच्या प्रयत्नातून या रस्त्याला गतवर्षी मंजुरी मिळाली. या वर्षी कामाला सुरुवात झाली आहे; मात्र, काम सुरू होताच विरोधकांनी आंदोलन, कामांत अडथळे, धमक्या आणि मारहाण यांसारखे प्रकार सुरू केले. आपल्या भागातील होणाऱ्या विकासकामांना विरोधकांकडून जो तीव्र विरोध दर्शविला जातो आहे, यावरून त्यांना विकास नको आहे, केवळ राजकीय खेळी करायची असल्याचे दिसते. ही त्यांची राजकीय स्टंटबाजी आहे. स्थानिकांनी रुंदीकरण होणाऱ्या रस्त्याचे स्वागतच केले आहे. स्थानिकांनी हा प्रकल्प सकारात्मकतेने स्वीकारला असून रस्त्याचे काम तातडीने होण्यासाठी सहकार्य करीत आहेत. असे असताना कोणी राजकीय व्यक्तीने राजकारण करून विकासकामाला अडथळा आणला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून विरोधकांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दंड थोपटले आहेत.’ यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, पंचायत समिती माजी उपसभापती लक्ष्मण नाईक, तालुका संघटक गोपाळ गवस, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, शहरप्रमुख शीतल हरमळकर, उमा देसाई, विभागप्रमुख रामदास मेस्त्री, विलास सावंत, सुनील गवस, कार्यालयीन प्रमुख गुरुदास सावंत उपस्थित होते.
...............
डाव हाणून पाडू
अशी अडवणूक केल्यास काम करण्यास जास्त कालावधी लागणार आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम झाले नाही, तर येथील जनता सत्ताधाऱ्यांवर आणि आमदार केसरकर यांच्यावर रोष व्यक्त करेल. म्हणून काम अडविण्याचे प्रकार विरोधक करीत आहेत. काम बंद करून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी ही त्यांची राजकीय खेळी चालू असल्याचा आरोप शिंदे शिवसेनेने केला. आम्ही कोणत्याही ठेकेदाराच्या समर्थनासाठी ही पत्रकार परिषद घेतली नाही. ठेकेदाराला काम करू दिले पाहिजे. काम चुकीचे होत असल्यास यंत्रणेला कळवून सुस्थितीत काम करून घेणे आवश्यक आहे. काम अडविणे, मारहाण असे प्रकार त्यांनी करू नये. पुन्हा असे केल्यास त्यांचा डाव हाणून पाडू, असा इशारा गवस यांनी विरोधकांना दिला.
......................
हिंसाचाराला आमंत्रण नको
रस्ता कामावर जात मारहाण करणे, दहशत निर्माण करणे हा गुन्हा आहे. काही अडचणी असतील तर संबंधित विभागाचे तहसीलदार किंवा प्रशासकीय यंत्रणेकडे जावे. विकासकामे अडवून, हाणामारी करून हिंसाचाराला मंत्र देऊ नका. याबाबत तहसीलदार कार्यालयात बैठक आयोजित केली जाईल. आमदार केसरकर यांनी रस्ते विकास महामंडळाला, व्यापारी, शेतकरी, नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकारांची खुली संयुक्त बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने तोडगा काढण्याचे स्पष्ट आदेशही दिले आहेत. रस्ते विकास महामंडळाचा जबाबदार अधिकारी दोडामार्ग येथेच तैनात ठेवावा, अशी मागणीही शिवसेनेने केली.
.........................
सकाळी विरोध, रात्री भेट
तालुक्यातील अनेक विकासकामे एमएनजीएल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कालवा विभाग याला त्यावेळी याच विरोधकांनी विरोध केला होता. सकाळी विरोध, सायंकाळी भेट हे दुटप्पी राजकारण तालुक्याला चांगलेच माहिती आहे, असा घणाघाती आरोप राजेंद्र निंबाळकर यांनी केला. जर आरोप खोटे वाटत असतील तर विरोधकांनी मंदिरात येऊन नारळाला हात लावावा, आम्हीही लावतो, मग दोडामार्गच्या जनतेला कळेल कोण सत्य बोलत आहे आणि कोण खोटे, असे खुले आव्हानही निंबाळकर यांनी विरोधकांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com