निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांची धमाल

निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांची धमाल

Published on

13755

निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांची धमाल

पाट शाळेचे वनभोजन; पक्षी निरीक्षणासह जन्या खेळांचा आनंद

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २७ ः शालेय उपक्रमातील दरवर्षीचा सर्वांत आवडीचा विषय असलेल्या वनभोजनाच्या निमित्ताने पाट क्रमांक १ शाळेतील विद्यार्थ्यांनी धमाल मस्ती केली. विस्तीर्ण आंबा कलम बागेतील झाडे, फुले, फळांचा अभ्यास करताना पक्षी निरीक्षणही केले. शिक्षकांबरोबरच पालकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्यामुळे कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली.
शाळेपासून जवळपासच्या अंतरावर असलेल्या मंदार प्रभूपाटकर यांच्या आंबा कलम बागेतील निसर्गरम्य परिसर या उपक्रमासाठी निवडला होता. विद्यार्थ्यांनी थंडी असूनही मोठ्या उत्साहाने ठरलेल्या जागेवर आपली आवर्जून उपस्थिती दर्शवली. नेहमीच्या शाळेतील अभ्यासाला सुटी देत एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात रमत मुलांच्या गप्पागोष्टी सुरू झाल्या. मुख्याध्यापक सुशीलकुमार ठाकूर, सहशिक्षिका दिव्या पिंगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यास सुरुवात केली. सकाळच्या सत्रात ठाकूर यांनी विविध झाडे व फळांची माहिती सांगितली. विविधरंगी पक्ष्यांची नावे, त्यांच्या मधुर शिळा ऐकण्याचा आनंदही या निमित्ताने घेतला.
विश्रांतीदरम्यान भेळ खाण्याचा आनंद घेतला. बागेतील डोंगराळ भागात शिक्षकांतसमवेत चालत वनाची सैरही केली. लांबलचक भरपूर चालून आलेल्या मुलांनी मग ‘धुवा हातपाय, बसा भोजनाला’ या स्वच्छता नियमाचे पालन करत दुपारच्या भोजनाचा आनंद घेतला. काही काळ सावलीत विश्रांती घेत मग सर्वांनीच आठवणी मनात साठवून घरची वाट धरली.
........................
बैठे, जुन्या खेळांनी वनभोजनात रंगत
‘आई तुझा रुमाल हरवला’, ‘पोपटा पोपटा तुझा रंग कोणता?’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘साप शिडी’, दगड गोट्यांचे खेळ, पकडापकडी, नारळाच्या करवंटीचा वापर करून लगोरी, आबाधोबी यासारखे पारंपरिक जुने आणि बैठे खेळ करत या उपक्रमाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com