दत्तू एक मेला
गावच्या मालका .........लोगो
(१४ डिसेंबर पान ६)
-rat२७p८.jpg-
२५O१३७६४
अप्पा पाध्ये-गोळवलकर
----
दत्तू एक मेला...
आमच्या परिसरात एकेक नग होऊन गेले अन् त्यांचा वारसा आजही काहीजण समर्थपणे चालवताहेत. जेव्हा फोन, मोबाईल वगैरे नव्हते त्या काळात पोस्टावरच अवलंबून लोक असायचे. त्यात पोस्टकार्डे, आंतर्देशीय पत्रे अन् अगदीच तातडी असेल तर तार हा पर्याय होता. पोष्ट हपीसात गेलात की, तो तारमास्तर त्या मशिनवर कडकट्ट कडकट्ट असा आवाज करत तारा पाठवत असे. गावात तार आली की, लोक घाबरत असत असा तो काळ होता. त्या काळातील हा किस्सा...
--अप्पा पाध्ये गोळवलकर, गोळवली.
----
त्या काळी लिहिता, वाचता येणारी माणसे दुर्मिळ होती मग एखाद्याला मुंबई वा अन्य ठिकाणी पत्र पाठवायचे असेल तर तो शिकलेल्या ईसमाकडे यायचा अन् पत्र लिहून घ्यायचा अन् पत्राच्या शेवटी लिहिणाऱ्याचा वाचणाऱ्याला नमस्कार असे लिहायला सांगायचा. असो, तर झाले काय मराठी शाळेशेजारी असणाऱ्या घरात दुपारी एकदम रडारड सुरू झाली मणून मास्तर त्या घरी गेले अन् विचारू लागले की, काय झाले, रडता का? तसे रडण्याचा आवाज आणखीच वाढला. तेव्हा रडण्यात सामील असलेला त्या घराशेजारील इसम होता तो मास्तरांना म्हणाला, अहो मास्तानू दत्तू गेला, आत्ताच पत्र आले, तेव्हा मास्तरांना जरा शंका आली म्हणून मास्तरानी पत्र वाचायला मागितले तर पत्रात लिहिले होते की, दत्तू एक मेला येणार होता तो आता येणार नाही कारण, रजा मिळत नाही; मात्र वाचणाऱ्याने असे वाचले की, ‘दत्तू एक मेला’ पुढचे वाचायच्या आतच त्याने हंबरडा फोडला की, आपला दत्तू गेला; मग मास्तरांनी सर्वाना शांत करून परत पत्र वाचून दाखवले तेव्हा साऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
त्या काळी एखाद्या माणसाच्या पुढ्यात जर कावळाकावळीचे झेंगट पडले की, तो माणूस किंवा त्याच्या जवळचे घरी तो माणूस मेला असे पत्र पाठवीत. अन् लगेचच तो माणूस सुखरूप असल्याचे पत्रही पाठवत असत; मात्र ते पत्र आधीच येत असे अन् गोंधळाला वाव राहात नसे.
तार करायची झाली तर कमीतकमी मजकूर असायचा कारण, प्रत्येक शब्दाला पैसे असायचे तर आमच्या गावातील एक सज्जन आमच्याकडे आला अन् म्हणाला की, मुलग्याला तार धाडायच्येय मुंबैत तर मजकूर लिहून द्या; काय लिहायचेय विचारले असता म्हणाला की, लिहा बाळू, कामाची खोटी, काळबादेवी मुंबै. याचा अर्थ असा होता की, बाळू, इथे कामाचा खोळंबा झालेला आहे तरी त्वरित निघून गावी ये. अन् पत्ता फक्त काळबादेवी मुंबई.
(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

