-चिपळुणात फुटीचा फटका महायुतीसह आघाडीलाही
आघाडी–युतीमधील फूटीमुळे निकाल बदलला
नेते-कार्यकर्त्यांमध्ये सामंजस्यांचा अभाव ; काँग्रेस, राष्ट्रवादीला फटका
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी व महायुतीचा गटही फुटला. भाजप-शिंदे सेनेने युतीचा धर्म पाळला; मात्र, काँग्रेसने आघाडीची साथ सोडल्याने आघाडीचा किल्ला गडगडल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील काही मुद्द्यांवर एकमत न झाल्याने त्याचा फटका शहरातील सहा प्रभागातील उमेदवारांना बसला. महायुतीत आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष अलिप्त राहिल्याने दोन प्रभागातील युतीच्या उमेदवारांना फटका बसला.
जिल्ह्यातील सर्वाधिक चुरशीची लढत चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत झाली. नगरसेवकपदाच्या २८ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीपासूनच महायुती व महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय झाला होता; परंतु, निवडणूक जवळ येताच प्रत्येक राजकीय पक्षात स्वबळाच्या हालचाली सुरू झाल्या. शेवटच्या क्षणी महायुतीतून काही राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष वेगळा झाला तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतून काँग्रेस बाजूला झाली.
आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम यांनी हातमिळवणी करत त्यांनीही काही उमेदवारांची स्वतंत्र मोट बांधून वेगळी वाट धरली. माजी खासदार विनायक राऊत यांनी ऐनवेळी परस्परविरोधी भूमिका घेतली. नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे हक्काच्या जागा काही मतांच्या फरकाने गमवाव्या लागल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) व उद्धव सेना एकत्रित लढली असती तर आणखी सहा जागा जिंकता आल्या असत्या. याच पद्धतीने राष्ट्रवादी (अजित पवार) सोबत असती तर महायुतीलाही मतांच्या आकडेवारीनुसार आणखी दोन जागा जिंकता आल्या असत्या. संबंधित उमेदवारांनी नेत्यांकडे आधीच आघाडीतील एक अर्ज मागे घेण्यासाठी शेवटच्या टप्प्यात तगादा लावला होता. मात्र, त्याची पक्ष व नेत्यांनी वेळीच दखल न घेतल्याने निवडणूक निकालात त्याचे परिणाम दिसले.
---
नगरपालिका निकालाचा विचार होणार...
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी व महायुतीचा गटही फुटला. त्याचा फटका महायुतीसह आघाडीलाही बसला. त्याचे परिणाम निकालावरही झाले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

