संगमेश्वर स्थानकाच्या प्लॅटफॉर्मलगत प्लास्टिकचा खच
-rat२७p१२.jpg-
२५O१३७७५
संगमेश्वर ः संगमेश्वर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मजवळ पडलेला प्लास्टिकचा खच.
-----
संगमेश्वर रेल्वेस्थानक अस्वच्छतेच्या गर्तेत
दुर्गंधी, धूर अन् डासांचा उपद्रव; प्रवाशांचे आरोग्य धोक्यात, उपाययोजनेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ ः संगमेश्वर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मजवळ साचलेला कचरा सध्या गंभीर समस्या बनला आहे. संपूर्ण परिसर दुर्गंधी, धूर व अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असताना याबाबत येथील रेल्वेस्थानक व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी ठरत आहे.
प्लास्टिक, अन्नकचरा, कागद, थर्माकोल यांचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात येतो. हा कचरा वेळेवर उचलला जात नसून, अनेकदा त्याच ठिकाणी जाळला जात असल्याने परिसरात दाट धूर पसरतो. या धुरामुळे श्वसनाचे विकार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कचरा जाळणे म्हणजे थेट कायद्याची पायमल्ली, घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणे पूर्णतः बेकायदेशीर आहे. विशेषतः प्लास्टिक कचरा जाळल्यास विषारी वायू निर्माण होतात, जे मानवी आरोग्यास आणि पर्यावरणास अत्यंत घातक आहेत. असे असतानाही संगमेश्वर रेल्वेस्थानक परिसरात हा प्रकार वारंवार घडत असल्याने येथील व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा उघड होत आहे. साठलेल्या कचऱ्यामुळे व पाण्याच्या साठ्यामुळे डास व मच्छर मोठ्या प्रमाणावर वाढत असून डेंगी, मलेरिया, चिकनगुनियासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
केंद्र व राज्यशासन स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यावर भर देत असताना, संगमेश्वर रेल्वेस्थानकातील ही अवस्था प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.
---
चौकट
सुशोभीकरणासाठी लाखोंचा खर्च वाया
गेल्या वर्षी संगमेश्वर रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलून सुशोभीकरण करण्यात आले. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले; मात्र वर्षभरातच येथील स्थानक बाहेरून सुंदर दिसते; मात्र परिसरात घाणीचे साम्राज्य आहे.

