‘जल जीवन’च्या ठेकेदारांची बिले न दिल्यास आंदोलन
13799
‘जल जीवन’च्या ठेकेदारांची
बिले न दिल्यास आंदोलन
अतुल बंगे ः प्रशासनाला इशारा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः हुमरमळा वालावल गावातील जल जीवन योजनेंतर्गत अपूर्ण राहिलेली कामे आणि सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांचे अडकलेले पैसे १५ जानेवारीपर्यंत द्यावेत, अन्यथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे कुडाळ-मालवण विधानसभा संपर्क प्रमुख अतुल बंगे यांनी दिला.
हुमरमळा वालावल गावात जल जीवन पाणीपुरवठा कामे मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली. मात्र, बऱ्याच गरीब ठेकेदारांचे पैसे अडकून आहेत. काही ठेकेदारांनी आपल्या वस्तू गहाण ठेवून कामगारांचे पैसे दिले आहेत, तर काहींनी कर्ज घेऊन कामावर खर्च केले. त्यांना अद्याप कामाचे पैसे मिळाले नसल्याने जगणे कठीण झाले आहे. शासन आज देईल, उद्या देईल या आशेत ठेकेदार आहेत, परंतु शासन पैसे देण्याचे नाव काढत नाही, असे बंगे यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे, अन्यथा १५ जानेवारीनंतर केव्हाही शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडणार असल्याचा इशारा बंगे यांनी दिला आहे.

