अवैध मासेमारी करणारी नौका पकडली
13880
अवैध मासेमारी करणारी नौका पकडली
मालवणात कारवाई; ‘मत्स्यव्यवसाय’च्या गस्तीनौकेला यश
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध सिंधुदुर्ग मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. मालवण समोरील समुद्रात अनधिकृतरित्या मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील एका नौकेला मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेने पकडले. ही नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली आहे.
गुरुवारी (ता. २५) रात्री ८.१५ च्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी मालवण समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील कोटा येथील ‘शैलजा ३’ (आयएनडी केए ०२ एमएम ४५६०) ही नौका महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात विनापरवाना मासेमारी करताना आढळली. या नौकेच्या मालक श्रीमती नेहा एस. कुंदर असून कारवाईवेळी नौकेवर तांडेल आणि इतर खलाशी उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय विभागाने नौका ताब्यात घेऊन सर्जेकोट बंदरात आणली. नौकेवरील मासळीचा लिलाव करण्याची प्रक्रिया सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी तथा सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी गणेश टेमकर, पोलिस कर्मचारी अर्जुन बांदिवडेकर, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक आणि रक्षक यांनी केली. अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे प्रतिवेदन सादर केले आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार या नौकेबाबतची सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात होणार आहे.

