शिमगा-गणपतीत निघणारी कुलपं लागूच नयेत
rat28p9.jpg-
13967
जयंत फडके
बोल बळीराजाचे ..............लोगो
इंट्रो
हेमंत ऋतूत मस्त थंडी आणि कोकणात सगळीकडे पसरलेला आंब्याच्या मोहोराचा आल्हाददायक सुगंध वातावरण चैतन्यमय बनवत आहे. भाताच्या नुकसानाने आणि लांबलेल्या पावसाने कावलेला माझा बळीराजा नव्या आशेवर स्वार होत आहे. ही आशा आहे समाधानाची, कर्तव्यपूर्णतेची..नाही दामदुप्पट उत्पन्नाची..की, श्रीमंती मिरवण्याची. माझ्या बळीराजाची जीवनपद्धतीच शेतीभोवती फेर धरणारी.. पैशाभोवती नाही. ज्यावर कोकणाची अर्थव्यवस्था चालते तो आंबाच खर्चापेक्षा जास्त उत्पन्न सात वर्षांत एकदा देतो..बाकी ‘उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा....’ यावरच आमची भिस्त ! पण म्हणून शेतकरी निराश नाही. यंदा पिकलं नाही, पिकलं ते पावसानं फुगवलं, वादळानं झोडपलं, हौरात वाहून गेलं म्हणून पुढच्या वर्षीचा पेरा कमी होणार नाही. वांजा मोहोरच दिसतोय म्हणून फवारणी थांबणार नाही आणि माकडं खातात तरी नारळ, शेवगा, केळं असं बरंच काही सोडणार नाही. कारण, हा त्याचा व्यवसाय नाही..रोजचं निखळ जगणं आहे.
- जयंत फडके, जांभूळआड, पूर्णगड रत्नागिरी
------
शिमगा-गणपतीत निघणारी कुलपं लागूच नयेत
गेले वर्षभर बळीराजाचे सगळं जगणं मांडण्याची संधी मिळाली. भात, नाचणी, आंबा, काजू, नारळ, मसाल्याची पिकं, कंदपिकं..यासारख्या बऱ्याच विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न झाला. मासेमारी, कुटुंबव्यवस्था, व्यसनाधीनता, राजकीय व्यवस्था, शासन-प्रशासन, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, यांत्रिकीकरणबाबतही ओघाने काही मुद्दे चर्चेला आले. यात कुठेच "माझं ते खरं" हा अट्टाहास नव्हता. खरंतर, एखादा छोटासा शेतकरी याबाबत काय लिहिणार0 पण फक्त यशोगाथा मांडत छान-छान मृगजळात तहानलेला बळीराजा वास्तवाच्या लख्ख उघड्याबोडक्या कातळावर व्यक्त झाला. "आपलं दुःख आणि दारिद्रय वेशीवर टांगलं तर सद्गुरू भेटतो म्हणतात. इथं "सद्विचार हाच सद्गुरूंचा साक्षात्कार" होता. पाठीशी अनुभवाचा डोंगर नाही, शेतीचं पुस्तकी शिक्षण नाही किंवा लेखक, शेतीतज्ञ असल्याचा अभिनिवेशही नाही. फक्त प्रामाणिक उद्देशाची साथ, वाचकांची पसंतीची, कौतुकाची थाप यावर वर्षभरात पन्नास लेख कोकणातील बळीराजाची कर्मकहाणी सांगते झाले. आपलं आपल्याला भरून पावलं. खुरई-सातविणाचं फुल आसमंतात सुगंध भरून गेलं.
याची नक्कीच खात्री आहे की लेख, परिसंवाद, प्रशिक्षण यांनी कोणी घडत आणि बिघडतही नाही. शासन-प्रशासन, विद्यापीठं आणि समाजव्यवस्थेत या बेंबीपासून बोंबलण्यानं काही फरक पडत नाही. अपेक्षा आहे ती पुढच्या पिढीकडून...माझं कोकण जिवंत रहावं, वाड्यात चार गुरं असावी, शेतीवाडी हाच आत्मा असावा, शिमगा-गणपतीत निघणारी कुलपं कधी लागूच नयेत. गर्दी, समस्या यांनी ओसंडून वाहणारी शहरं हे जीवन नाही हे आपलं आपणं जाणावं. परमेश्वरानंच बनवलेलं नंदनवन. माझं कोकण "सुजलाम-सुजलाम" बनावं. निसर्गाचा वरदहस्त आहेच फक्त तो सत्कारणी लागावा. धोरणकर्त्यानी कधी तरी माझ्या बळीराजाला काय हवं ते तरी विचारावं. फुटभर पडणारा पाऊस टीचभर तरी उपयोगी पडावा. वैज्ञानिक प्रगती शेतीच्या भल्यासाठी वापरली जावी. प्रक्रिया उद्योग, यांत्रिकिकरण, संशोधन यांनी सोन्याचा धूर कोकणातून नाही निघाला तरी चालेल पण "इथे काही संधीच नाही" या काळ्या धुराच्या औष्णिक, रासायनिक, कोकणचं वाळवंट करणाऱ्या, त्याचाच धूर ओकणाऱ्या चिमण्या तरी बंद व्हाव्या. तथाकथित, अवास्तव विकासाच्या डामरट रस्ते, पाखाड्या आणि भौतिक बांधकामं या कल्पना ही साधनंच चुकीची आहेत. साध्य तर खुप लांबची गोष्ट हे कुठेतरी अधोरेखित व्हावं. कोकणच्या संस्कृतीला, समाजमनाला, निसर्गदत्त साधनसंपन्नतेला बळीराजाच्या कल्पनेनुसार विकसित होऊ द्यावं. कोकणचा कॅलिफोर्निया राहू द्या, कोकणपण तरी जपावं. अगदी सोप्प म्हणाल तर कोकणचं नंदनवन कोकणातील बळीराजानं जपावं, वृद्धीगत करावं बस्स एवढंच..! निरोपाच्या शब्दाला..अजून आपल्या कल्पनेनं बळ द्यावं.
(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

