कर्वे इन्स्टिट्यूटतर्फे महिलांसाठी मोफत बेकरी प्रशिक्षण

कर्वे इन्स्टिट्यूटतर्फे महिलांसाठी मोफत बेकरी प्रशिक्षण

Published on

महिलांसाठी मोफत बेकरी प्रशिक्षण
बाया कर्वे इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने आयोजन
रत्नागिरी, ता. २८ : बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने महिलांसाठी मोफत व्यावसायिक बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी- अमृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यावतीने आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने हे प्रशिक्षण ५ जानेवारी २०२६ पासून १८ दिवस निवासी स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
मारुती मंदिर येथील नलावडे कॉम्प्लेक्समधील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम होईल. महिलांना कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांना उद्योजकतेकडे प्रवृत्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षण काळात सहभागी महिलांना आधुनिक बेकरी उद्योगाशी संबंधित सैद्धांतिक तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये केक, ब्रेड, पेस्ट्री, कुकीज, पाव, टोस्ट, पिझ्झा, बर्गर बन, चॉकलेट आदी विविध बेकरी पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकविण्यात येणार आहे. अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार असून प्रशिक्षणार्थींना निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वयंरोजगार व लघुउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही दिले जाणार आहे. शासकीय कर्ज व अनुदान योजना, उद्योग उभारणीची प्रक्रिया, व्यवसाय नोंदणी, परवाने याविषयी मार्गदर्शन केले जाईल.
प्रशिक्षण खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आहे. अर्जदार महिला किमान ८ वी उत्तीर्ण व १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे. इच्छुक महिलांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com