सरगुरोह, पिसे, कोवळे सर्वात तरुण नगरसेवक
सरगुरोह, पिसे, कोवळे
सर्वात तरुण नगरसेवक
चिपळूण पालिका ; शहराच्या विकासाचे आव्हान
चिपळूण, ता. २८ ः चिपळूण पालिका निवडणूक या वेळी अनेक अर्थांनी आगळीवेगळी ठरली असून या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तरुणांची टीम नगर पालिकेत दाखल झाली आहे. तरुण नेतृत्वामुळे आगामी काळात शहराच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. साजिद सरगुरोह, शुमम पिसे, निहार कोवळे हे सर्वात तरुण नगरसेवक पालिकेत जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करणार आहेत.
या निवडणुकीत शशिकांत मोदी चौथ्यांदा नगर पालिकेत निवडून आले असून सफा गोठे आणि रसिका देवळेकर यांनी दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून प्रवेश केला आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ हेही दुसऱ्यांदा नगर पालिकेत जात असून त्यांच्यासोबत तरुण नगरसेवकांची भक्कम टीम काम करताना दिसणार आहे.
काँग्रेसचे प्रभाग २ चे साजिद सरगुरोह हे सर्वात तरुण नगरसेवक ठरले आहेत. वयाच्या २९व्या वर्षी ते नगरसेवक झाले आहेत. भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक १२ मधून विजयी झालेले शुभम दयानंद पिसे हे या निवडणुकीतील विशेष आकर्षण ठरले आहेत. अवघ्या ३० व्या वर्षी १५० व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिपळूण पालिकेचे नगरसेवक होण्याचा मान त्यांना मिळाला. हे दोघे नगर पालिकेतील सर्वात तरुण नगरसेवक ठरले आहेत. तसेच ३३व्या वर्षी निहार कोवळे यांनी पालिकेत प्रवेश केला आहे. एकूणच चिपळूण नगर पालिकेतील नगरसेवकांचे सरासरी वय ३० ते ३५ वर्षांच्या आसपास असून, तरुणाईकडे विकासाची धुरा सोपवली गेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

