रत्नागिरी- समाजात धार्मिक द्वेषाचे विष पेरले जातेय

रत्नागिरी- समाजात धार्मिक द्वेषाचे विष पेरले जातेय

Published on

समाजात धार्मिक द्वेषाचे विष पेरले जातेय
उल्का महाजन; नवनिर्माणमध्ये इंद्रधनु युवा महोत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ः देशात शेती हळूहळू संपवली जात असून, शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत. जात आणि धर्माच्या नावावर जाणीवपूर्वक समाजात दुही माजवली जात असून, धार्मिक द्वेषाचे विष पेरले जात आहे. ते विष मनात उतरू देऊ नका आणि ते पसरवणाऱ्या शक्तींना थारा देऊ नका, असा परखड संदेश ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी दिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या विचारांप्रमाणे ‘अमृत पेरण्याची’ ताकद युवकांमध्ये निर्माण झाली तरच खऱ्या अर्थाने संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होईल, असेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरीतील हेगशेट्ये महाविद्यालयात आयोजित इंद्रधनु युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्य डॉ. संजय गवाळे, नवनिर्माण हायस्कूलचे मुख्याध्यापक उल्हास सप्रे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख सुकुमार शिंदे आदी उपस्थित होते. महाजन यांनी युवकांनी आपल्या आजूबाजूच्या विविध उद्योगांचा आपल्या जीवनावर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कोकणचा विकास खऱ्या अर्थाने विकासाकडे जात आहे की विनाशाकडे, याची सजग जाणीव समाजात निर्माण होणे गरजेचे आहे, असे सांगत त्यांनी लोटे येथे प्रस्तावित असलेल्या विनाशकारी प्रकल्पांकडे लक्ष वेधले. रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील शांताताई या कष्टकरी महिलेने सावकारशाहीच्या शोषणाविरोधात पुकारलेल्या बंडाचा उल्लेख करत त्यांनी ४० जोडप्यांना वेठबिगारीतून मुक्त केल्याचे उदाहरण दिले. आज अनेक कंपन्या सामान्य माणसाच्या जगण्याशी खेळ करत आहेत. देशाचे मालक पुढारी नसून आपण नागरिक आहोत, ही जाणीव ठेवून चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला शिका, असे आवाहन त्यांनी केले. प्रदूषणकारी प्रकल्पांमुळे नदी, नाले, पर्यावरण आणि निसर्गाचा नाश होत असेल तर तो विकास नसून विनाश आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना संविधानातील मुल्ये आणि अधिकार राबवण्यासाठी आजची पिढी सजग नसेल तर देश पुन्हा गुलामगिरीकडे ढकलला जाण्याचा धोका असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. मोठ्या कष्टाने आणि विविध धर्मांच्या सहभागातून साकार झालेले संविधान आज धोक्यात असून, त्याच्या रक्षणासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी चावडी फातिमा सावित्री या महिलांचे आवाज बुलंद करणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com