चिपळूण- चांगले रस्ते झाले तर बारमारी पर्यटन वाढेल

चिपळूण- चांगले रस्ते झाले तर बारमारी पर्यटन वाढेल

Published on

rat30p19.JPG
14384
चिपळूण - कुंभार्ली घाटातील रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे पर्यटकांनी चिपळूणकडे पाठ फिरवली आहे.
rat30p20.JPG
14385
मुंबई-गोवा महामार्गावरून येणाऱ्या पर्यटकांची वाहने परशुराम घाटात विश्रांती आणि जेवणासाठी थांबत आहेत.


रस्ते सुधारले तर कोकणात वर्षभर पर्यटन
पर्यटकांच्या अपेक्षा; पर्यायी रस्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० : रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनवाढीला रस्त्यांच्या दुरवस्थेचा खो बसत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्याला जोडणारे रस्ते अधिकाधिक चांगले झाले तर कोकणात बारमाही पर्यटन सुरू राहील. त्याचा फायदा पर्यटन व्यवसायाला होईल. हंगाम वगळताही पर्यटक कोकणात येणे पसंत करतील. नाताळच्या सुट्टीनिमित्त विविध पर्यटनस्थळांवर आलेल्या पर्यटकांकडून रस्त्यांच्या दुरूस्तीबाबत अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
नाताळ सुट्टी, नववर्ष स्वागतासाठी पुणे-मुंबईसह राज्यातील विविध भागांतील पर्यटकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांवर प्रचंड गर्दी आहे; मात्र, जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे व ऐतिहासिक स्थळांकडे जाण्यासाठीच्या रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि सतत होणारी वाहतूककोंडी यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. शाळा व महाविद्यालयांच्या सहलींसह विद्यार्थ्यांचा ओघही यंदा वाढलेला आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या चलती आहे. तरीही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वारंवार होणारी वाहतूककोंडी पर्यटकांची डोकेदुखी ठरलेली आहे. त्यामुळे प्रवासाचे वेळापत्रक बिघडत असून, पर्यटन कंटाळवाणे झाले आहे.
आंबाघाटातील रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. कुंभार्ली घाटातील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनी ताम्हिणी घाटमार्गे रत्नागिरी जिल्ह्यात येण्याचा पर्याय निवडला. परिणामी, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या वाढली असून, तिकडेही वाहतूककोंडी होत आहे. त्यामधून मार्गक्रमण करताना पर्यटक बेजार झाले आहेत.
कराड येथून दापोलीला जाण्यासाठी आलेले युवराज देसाई यांनी कुंभार्ली घाटातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, खड्ड्यांतून प्रवास करताना आम्हाला नियोजित ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला. आमच्यासोबत घाटातून प्रवास करणारे अन्य वाहनचालकसुद्धा अक्षरशः जीव मुठीत धरून घाट उतरत आहेत.
कुंभार्ली घाटातील रस्त्याच्या दुरवस्थेच्या त्रासापासून वाचण्यासाठी पुणे येथील सचिन वाणी हे उद्योजक आपल्या कुटुंबासह ताम्हिणी घाटमार्गे चिपळूणमध्ये परशुराम देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. रस्त्याचे चौपदरीकरण झाले असले तरी वाहनांची संख्या वाढल्याने त्यांना चिपळूणमध्ये येण्यासाठी प्रचंड मानसिकता सहन करावी लागली.

कोट
विकेंडला फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. परिणामी, पर्यटकांना तासन्‌तास रस्त्यावर खोळंबून राहावे लागते. परिणामी, इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होतो. मुंबई-गोवा महामार्गावर सतत वाहतूककोंडी होत आहे. अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पर्यटक तासन्‌तास अडकून राहतात. काही अंतर्गत मार्गांची अवस्थाही अत्यंत खराब आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट असल्याने खड्डे, खाचखळगे, अरूंद रस्ते आणि अपूर्ण कामांमुळे वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- प्रतीक्षा कुंभार, पर्यटक पाटण

चौकट
कुंभार्ली घाटाकडे पर्यटकांची पाठ
पाटणमार्गे कुंभार्ली घाटातून चिपळुणात येणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. येथील दहा ते पंधरा फुटापर्यंतचा रस्ता वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणी वाहनांना अपघात होण्याचा धोका आहे. खराब रस्ते व खड्ड्यांमुळे अनेक पर्यटक चिपळूणकडे पाठ फिरवत असून, काही पर्यटक सिंधुदुर्ग व रायगड आणि रत्नागिरीसारख्या पर्यटन जिल्ह्यांकडे वळत आहेत. परिणामी, चिपळूणसह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर गंभीर संकट ओढावल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com