रामानंदाचार्य दक्षिण पीठातर्फे ९ राज्यात रक्तदान शिबिरे
रामानंदाचार्य दक्षिण पीठातर्फे रक्तदान शिबिरे
९ राज्यात १५ दिवसांत १,४६० शिबिरांचे आयोजन; तुटवडा लक्षात घेऊन नियोजन
सकाळ वृत्तसेवा
पाली. ता. ४ ः नाणीज येथील जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य रामानंदाचार्य दक्षिण पीठाच्या आध्यात्मिक प्रेरणेने महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यांत मानवतेच्या सेवेस समर्पित अशा ‘जीवनदान महाकुंभ’ महारक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. १८ जानेवारीपर्यंत सलग १५ दिवसांत १ हजार ४६० ठिकाणी महारक्तदान शिबिरे घेण्यात आली आहेत. या माध्यमातून लाखो रक्तकुपिका संकलित करण्याचा संकल्प रामानंदाचार्य दक्षिण पीठाने केला आहे. यामध्ये महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, दादरा-नगर हवेली व दमण-दीव या राज्यांचा समावेश आहे.
जानेवारी ते मार्च या कालावधीत देशभरात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होतो. हे लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदा जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून हा महारक्तदान संकल्प साकार करण्यात आला आहे. अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून राष्ट्रसेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी केले आहे. या महारक्तदान शिबिरामध्ये संकलित होणारे रक्त राज्य रक्त संक्रमण सेवाअंतर्गत शासकीय व अधिकृत रक्तपेढ्यांमार्फत वितरित करण्यात येणार आहे. या रक्तदानाचा थेट लाभ समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना होणार आहे. तसेच मायक्रोसाइटिक ॲनिमिया, सिकलसेल, थॅलेसिमीया, हिमोफिलीया, ब्लड कॅन्सर यासारख्या गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यास हे रक्तदान उपयुक्त ठरणार आहे. शासकीय रुग्णालयांतील रुग्णांनाही याचा मोठा लाभ होणार आहे. रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधामच्या इतिहासात रक्तदान ही केवळ सामाजिक कृती नसून, विशिष्टाद्वैत सिद्धांतावर आधारलेली सजीव उपासना आहे.
चौकट
मागील पाच वर्षातील लेखाजोखा
मागील २५ वर्षांहून अधिक काळापासून या परंपरेचे सातत्य दिसून येते. २००३ साली नाशिक कुंभमेळ्यात अवघ्या १० तासांत ६ हजार ४९० रक्तकुपिकांचे संकलन केल्या गेल्या. तसेच २०१६ मध्ये जगद्गुरुंच्या वाढदिवसानिमित्त ७०० कॅम्पमध्ये ६५,४८७ रक्तकुपिका, २०१७ मध्ये २५ हजार ५८३, २०१८ मध्ये ५० हजार, २०१९ मध्ये ६० हजार ८९८ तर २०२४ मध्ये तब्बल ८१ हजार १०७ रक्तकुपिका संकलित झाल्या आहेत. २०२५ मध्ये १५ दिवसांत १ लाख ३६ हजार २७२ रक्तकुपिकांचे संकलन करण्याचे निश्चित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

