शेतकरी संघटना ''रास्ता रोको''च्या तयारीत
swt536.jpg
15770
बांदाः येथील बैठकीत निरवडे येथील तरुण प्रगतशील शेतकरी प्रणव नाडकर्णी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
शेतकरी संघटना ‘रास्ता रोको’च्या तयारीत
बांद्यातील बैठकीत चर्चाः वन्यप्राणी उपद्रवासह काजू दरप्रश्नी आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी व फळबागायतदार संघ तसेच सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड यांच्यावतीने बांदा येथील कार्यालयात जिल्ह्यातील शेतकरी, फळबागायतदार व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात वन्यप्राणी उपद्रव व काजू दराच्या प्रश्नावर येत्या आठ दिवसांत बांदा येथे महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांना एकत्र आणून आंदोलनाची अंतिम तारीख ठरविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, कृषी शास्त्रज्ञ डॉ. मोहन दळवी (घोडगे), जिल्हा विद्युत निवारण मंचाचे अध्यक्ष संजय लाड (माडखोल), दोडामार्ग फळबागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई (कळणे), सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्यूसर कंपनीचे संचालक नितीन मावळंकर (बांदा), झोळंबे दुग्ध सोसायटीचे चेअरमन नारायण गावडे, प्रगतशील काजू बागायतदार राकेश धर्णे (साटेली), दोडामार्ग शेतकरी संघाचे खजिनदार आकाश नरसुले (कुडासे), प्रगत शेतकरी अभय नांगरे (शिरवल), प्रदीप सावंत (केसरी), विष्णू सावंत (रोणापाल), बॉबी उर्फ अजित देसाई (सरपंच, कळणे), उल्हास परब (माजी सरपंच, मडूरा), दादू उर्फ गोविंद सावंत (देवसु), मंगलदास देसाई (डेगवे), अमित सावंत (सरपंच, कुंब्रल), राजू पवार (वैभववाडी), गोपाळ करमळकर (पाडलोस), सज्जन नाईक (भाकरवाडी) आदींसह दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ व वैभववाडी तालुक्यातील अनेक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रास्ताविकात अध्यक्ष सावंत यांनी मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाशी सुरू असलेल्या काजू दर चर्चेची माहिती दिली. येत्या २०२६ काजू हंगामासाठी हमीभाव निश्चित करण्यासाठी आमदार व खासदारांना निवेदन देण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केवळ चर्चा न करता वन्यप्राणी उपद्रवावर शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे स्पष्ट केले.
काजूला आधारभूत किंमत देणे आणि वन्यप्राणी उपद्रवावर तोडगा काढणे हे शासनाचे कर्तव्य असल्याचे मत कृषी शास्त्रज्ञ डॉ. मोहन दळवी यांनी व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षमीकरण, दरपत्रक जाहीर करण्यासाठी पाठपुरावा आणि इतर जिल्ह्यातील एपीएमसींचा अभ्यास दौरा आयोजित करण्याची सूचना नारायण गावडे यांनी मांडली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची स्वतंत्र वोटबँक निर्माण करून शेतकरी उमेदवार उभे करावेत, अशी मागणी अनेक वक्त्यांनी केली.
बैठकीअंती सिंधुदुर्गातून परदेशातील शेतीविषयक अभ्यासदौऱ्यासाठी निवड झालेल्या निरवडे येथील तरुण प्रगतशील शेतकरी प्रणव नाडकर्णी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विलास सावंत यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

