मातीत रुजतेय सांस्कृतिक लोकचळवळ
देवरूखच्या मातीत रूजतेय सांस्कृतिक लोकचळवळ
अभिरूचीचा स्वरोत्सव; ११ पासून कार्यक्रमांना सुरुवात, सूरांचा वारसा नव्या पिढीकडे
सकाळ वृत्तसेवा
‘अभिरूची’ हा शब्द आजच्या काळात काहीसा गुळगुळीत होत चालला असताना, देवरूखसारख्या निमशहरी भागात अभिजात शास्त्रीय संगीताची परंपरा टिकवून धरणे आणि रसिकांची सांगितिक ओढ वाढवणे, हे एक मोठे आव्हान होते. हेच आव्हान पेलत गेल्या तीन दशकांपासून अभिरुची देवरूख’ ही संस्था एक भक्कम सांस्कृतिक चळवळ म्हणून उभी राहिली आहे.
कोकणात उत्सव हे परंपरेचा अविभाज्य भाग आहेत. याच विचारातून २००३ मध्ये अभिरुची स्वरोत्सव’ हा तीन दिवसांचा संगीत महोत्सव सुरू झाला. लोकांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण व्हावी यासाठी एक दिवस शास्त्रीय गायन, एक दिवस वाद्यसंगीत आणि एक दिवस सुगम संगीत किंवा संगीत नाटक अशी या महोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करण्यात आली.
कलेचा वृथा अभिमान न बाळगता स्वतःच्या आनंदासाठी आणि लोकजागृतीसाठी ही संस्था काम करते. विशेष म्हणजे, कार्यक्रमातून मिळणारे मानधन कोणीही वाटून न घेता ते पुढील कार्यक्रमांच्या आयोजनासाठी वापरण्याची परंपरा आजही कायम आहे. १९८५-८६च्या सुमारास देवरूखमधील काही सामान्य मध्यमवर्गीय महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येऊन ‘स्वरबहार भजन मंडळ’ स्थापन केले. त्या काळी गावात संगीत शिकण्याची कोणतीही सोय नव्हती. हार्मोनिअमसाठी बाबीराव सरमुकादम आणि तबल्यासाठी मनमोहन कुंभारे यांनी शिकवणे सुरू केले; परंतु आर्थिक अडचणींमुळे ते फार काळ टिकू शकले नाहीत. तरीही संगीताची ही ओढ कमी झाली नाही आणि १९९१मध्ये अभिरुची देवरूख’ संस्थेची स्थापना झाली. यंदाचा ‘स्वरोत्सव’ हा २१वा असून, तो कृतज्ञतेचा उत्सव आहे. ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी प्रख्यात गायक पंडित व्यंकटेश कुमार यांचे गायन, दुसऱ्या दिवशी मानस कुमार यांचे व्हायोलिन वादन, तिसऱ्या दिवशी लोकप्रिय संगीत नाटक ‘होनाजी-बाळा’ असे कार्यक्रम होणार आहेत. आजच्या सोशल मीडियाच्या युगात रसिकांची प्रत्यक्ष उपस्थिती कमी होत असताना शास्त्रीय संगीताचा हा वारसा पुढील पिढीकडे सोपवण्यासाठी पावले उचलली जात आहेत तसेच शाळाशाळांमधून संगीत शिक्षणाची सोय व्हावी आणि पालकांनी आपल्या मुलांना कलेची गोडी लावावी, असे आवाहन अभिरुची परिवारातर्फे करण्यात आले आहे.
----
चौकट
१००हून अधिक मैफलींचे आयोजन
गेल्या २० वर्षांत अभिरूचीने १००हून अधिक दर्जेदार मैफलींचे आयोजन केले. पंडित विजय कोपरकर, अश्विनी भिडे, राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी, देवकी पंडितसारख्या दिग्गज गायकांपासून ते पंडित सतीश व्यास (संतूर), विजय घाटे (तबला) सारख्या वाद्यनिपुण कलाकारांपर्यंत अनेकांनी येथे आपली कला सादर केली आहे तसेच ‘मृच्छकटिक’, ‘संशयकल्लोळ’ यांसारख्या संगीतनाटकांनीही या महोत्सवाची उंची वाढवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

