दोडामार्गात आमसभा
आवश्‍यक ः गवस

दोडामार्गात आमसभा आवश्‍यक ः गवस

Published on

दोडामार्गात आमसभा
आवश्‍यक ः गवस
दोडामार्ग ः तालुक्यातील जनतेच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी आमसभा हाच लोकशाही मार्ग असताना, दीर्घकाळापासून आमसभा न झाल्याने तालुक्यातील समस्या अधिक तीव्र होत आहेत. स्थानिक आमदारांनी या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, तातडीने आमसभा आयोजित करावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष गुणाजी गवस यांनी केली आहे. तालुक्यात हत्ती समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून शेतकरी व ग्रामस्थ भयभीत आहेत. याशिवाय आडाळी एमआयडीसी, तिलारी परिसरातील पर्यटन विकास, आरोग्य सुविधा या प्रश्नांकडे प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. या सर्व प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी आमसभा अत्यावश्यक आहे; मात्र आमसभा न झाल्याने जनतेला व्यथा मांडण्याचे व्यासपीठच मिळत नसल्याचे गवस यांनी सांगितले. याची दखल घेऊन तत्काळ आमसभा आयोजित करावी; अन्यथा काँग्रेस पक्ष आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल, असा इशाराही दिला आहे.
---
वैभववाडीत आज
मानसोपचाराचे धडे
वैभववाडी ः तालुक्यात वाढत्या मानसिक ताणतणाव, व नैराश्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील दत्तकृपा प्रतिष्ठानतर्फे तणाव, नैराश्य आणि उपाय यासंदर्भात उद्या (ता. १३) अर्जुन रावराणे विद्यालयात सकाळी ११ वाजता व्याख्यान आयोजित केले आहे. केईएम रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मानसिक तणावामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. वैभववाडी तालुक्यातही गेल्या काही दिवसांत या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मानसिक संतुलन चांगले राहावे आणि आत्महत्येचा विचारही कुणाच्या मनात येऊ नये, या दृष्टीने केईएम रुग्णालय मुंबईचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रतीक लाड, डॉ. राहुल पेंढारी मार्गदर्शन करणार आहेत. सध्याच्या वातावरणात ताणतणाव हा विषय महत्त्वपूर्ण असून या व्याख्यानाला तालुक्यातील सर्व नागरिक, व्यापारी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दत्तकृपा प्रतिष्ठानने केले आहे.
......................
कापडी पिशव्यांचे
दोडामार्गात वाटप
दोडामार्ग ः कसई-दोडामार्ग नगरपंचायतीतर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून कापडी पिशवी वाटप उपक्रम घेतला. केंद्राच्या स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शहर स्वच्छ, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नगरपंचायतीकडून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण रोखणे व पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे, या उद्देशाने कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले. नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, उपनगराध्यक्ष देविदास गवस, शिक्षण व आरोग्य सभापती संजना म्हावळणकर, नगरसेवक संतोष नानचे, राजेश प्रसादी, नितीन मणेरीकरी, चंदन गावकर, रामचंद्र मणेरीकर, रामचंद्र ठाकूर, पांडुरंग बोर्डेकर, संध्या प्रसादी, सुकन्या पनवेलकर, ज्योती जाधव, क्रांती जाधव, सोनल म्हावळणकर, गौरी पार्सेकर, वासंती मयेकर उपस्थित होत्या.
---
कलंबिस्त हायस्कूलचे
रेखाकला परीक्षेत यश
सावंतवाडी ः शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षांचा कलंबिस्त इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. एलिमेंटरी परीक्षेला एकूण २२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ‘ए’ श्रेणीमध्ये ३, ‘बी’ श्रेणीमध्ये ३ तर ‘सी’ श्रेणीत १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट परीक्षेला एकूण २७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी ‘ए’ श्रेणीत ८, ‘बी’ श्रेणीत ७ तर ‘सी’ श्रेणीत १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, मुख्याध्यापक अभिजित जाधव आदींनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक शरद सावंत यांनी मार्गदर्शन केले.
....................
वैभववाडीत शुक्रवारी
‘मुत्रविकार’ तपासणी
वैभववाडी ः अथायू युरो केअर कोल्हापूर, तालुका बौद्धसेवा संघ आणि माता रमाई महिला मंडळातर्फे शुक्रवारी (ता. १६) येथील आंबेडकर भवन येथे मोफत मूत्रविकार शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. ही शस्त्रक्रिया महात्मा फुले व आयुष्मान भारत योजनेतून केली जाणार आहे. गरजू रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावरील शस्त्रक्रिया निश्चित केली जाणार आहे. शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या रुग्णांनी रेशन कार्ड, आधार कार्ड, जुने रिपोर्ट सोबत घेऊन यावे, असे आवाहन केले आहे.
-------
मालवणात २६ ला
‘सीरियल किलर’
मालवण ः मालवण देऊळवाडा येथील महापुरुष पार येथे सत्यनारायण महापूजा व अन्य कार्यक्रम २६ जानेवारीला आयोजित केले आहेत. ५८ व्या वर्षी हा उत्सव साजरा होत आहे. सकाळी दहाला श्रींचे पूजन, दुपारी बाराला तीर्थप्रसाद, सायंकाळी पाचला भजने, रात्री दहाला ‘सीरियल किलर’ ही कौटुंबिक विनोदी नाट्यछटा सादर करण्यात येणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन बाळगोपाळ मंडळ, देऊळवाडातर्फे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com