नाखरेतील वणव्यात दोन बागा खाक
rat12p27.jpg-
17146
पावस ः नाखरे रामेश्वरवाडी येथील पांडुरंग गुरव यांच्या बागेतील खाक झालेली कलमे.
rat12p33.jpg-
O17180
पावस ः नाखरे येथील वणव्यावर नियंत्रण मिळवताना ग्रामस्थ आणि फिनोलेक्स कंपनीच्या अग्निशमन दलाचे जवान.
---------------
नाखरेतील वणव्यात दोन बागा खाक
सलग दुसऱ्या दिवशी आग; दोन बागायतदारांना फटका, ४० कलमे होरपळली, लाखाचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १२ः रत्नागिरी तालुक्यातील नाखरे रामेश्वरवाडी परिसरातील दोन बागायतदारांच्या बागेला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असून, सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. ही आग सोमवारी (ता. १२) सकाळी दहाच्या दरम्यान लागली असून, सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आली; मात्र तोपर्यंत ४० आंबा, काजू कलमे खाक झाली आहेत. रविवारी याच ठिकाणी लागलेल्या आगीत एका प्रौढाचा होरपळून मृत्यू झाला होता. वारंवार लागणाऱ्या वणव्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत.
फिनोलेक्स कंपनीच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. यामध्ये हापूस आंबा व काजूची झाडे आगीच्या भस्मस्थानी पडली. रविवारी तालुक्यातील नाखरे रामेश्वरवाडी स्मशानाजवळ असलेल्या एका बागेमध्ये आग लागल्यामुळे वैद्य यांच्या बागेतील एकाचा गुदमरून मृत झाला होता. त्यानंतर त्या परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र गेले दोन-तीन दिवस थंडीचे प्रमाण कमी झाले असून जोरदार वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन वणवे लागत आहेत. तसाच प्रकार सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास नाखरे-रामेश्वरवाडी परिसरात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. त्यामध्ये पांडुरंग रामचंद्र गुरव यांच्या बागेतील मोहोर आलेली काजूची पंधरा व हापूस आंब्याची १५ अशी सुमारे ३० कलमे भस्मसात झाली. त्यामध्ये त्यांचे सुमारे ६० ते ७० हजाराचे नुकसान झाले. तसेच त्यांच्या शेजारी असलेल्या पोळेकर यांच्या बागेला आग लागून त्यांचीही दहा कलमे आगीच्या भस्मसात झाली. यामध्ये त्यांचे सुमारे 30 हजाराचे नुकसान झाले. या संदर्भात तातडीने फिनोलेक्स अग्निशमन दलाला कळल्यानंतर साडेदहाच्या दरम्यान अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झाले. त्याने आग विझवण्यास सुरवात केली. तरीही आग आटोक्यात आणण्यात सुमारे दीड तास गेला. तलाठी नागवेकर, उपसरपंच विजय चव्हाण, पोलिसपाटील सुधीर वाळींबे आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. फिनोलेक्स अग्निशमन दलाला स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली. त्यामुळे आग आणखी पसरली नाही.
चौकट
आठ दिवसात चार ठिकाणी वणवा
दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात वणवे लागल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या आठ दिवसात खरवते, वेतोशी, नाखरे या ठिकाणी दोनवेळा वणवे लागून लाखोंची हानी झाली आहे. पंचनामा झाला असून, भरपाई मिळणार असली तरी लागणारे वणवे यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
चौकट
उत्पन्नाला मोठा फटका
वणवे लागून मोहोर आलेली आंबा, काजूची कलमे खाक होत असल्याने बागायतदारांच्या हंगामावर मोठा परिणाम होणार आहे. यावर्षी झाडांना चांगला मोहोर आला असून, अनेक ठिकाणी मोहोरातून कणी डोकावू लागली आहेत. त्यामुळे फवारणीही जोरात सुरू आहे. अशावेळी वणवे लागून बागा नष्ट होत असल्याने बागायतदार चिंतेत पडले आहेत.
चौकट
कातळावरील बागा पुन्हा कशा उभ्या राहणार
तालुक्यात कातळजमिनीवर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करून आंबा, काजूच्या बागा फुलवण्यात येत आहेत. त्यासाठी प्रचंड खर्च करण्यात येत आहे. पाण्याचीही व्यवस्था केली जात आहे. ही कलमे पाच वर्षाची झाल्यानंतर उत्पन्न देऊ लागतात. त्याचवेळी कातळावरील गवताला लागलेल्या वणव्यात या आंबाबागा खाक होत आहेत. त्यामुळे पाच वर्षे केलेला खर्च, त्यासाठी काढलेले कर्ज यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. ही बाग पुन्हा उभी करण्यासाठी पुन्हा खर्च करून पाच वर्षे वाट बघणे बागायतदारांना परवडण्यासारखे नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

