केबिनमध्ये स्वाक्षऱ्या, बाहेर येताच भोवळ

केबिनमध्ये स्वाक्षऱ्या, बाहेर येताच भोवळ

Published on

केबिनमध्ये स्वाक्षऱ्या, बाहेर येताच भोवळ

दबावाखाली कार्य; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह


सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ः जिल्हा स्तरावरील एका कार्यालयात नवख्या असलेल्या प्रभारी महिला अधिकाऱ्याची कोट्यवधी रुपयांच्या वादग्रस्त निविदेवर स्वाक्षऱ्या करून घेण्यात आल्याने त्या अधिकाऱ्याला चक्क भोवळ आली. त्यांना थेट रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची वेळ आली. आचारसंहिता लागण्याआधी काही तास झालेल्या या प्रकाराची चर्चा आता मुख्यालयात रंगू लागली आहे.
संबंधित विभागातील नियमित अधिकारी पदोन्नतीने बदली होऊन गेले; मात्र बदलीपूर्वी त्यांनी आवश्यक कामेच केली नाहीत. शासनाने त्यांच्या जागी नवीन अधिकारी दिला नाही. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त पदभार समांतर विभाग असलेल्या समकक्ष महिला अधिकाऱ्याकडे देण्यात आला; परंतु बदलून गेलेल्या नियमित अधिकाऱ्याने महत्वाची कामे केली नसल्याने त्याचा सारा बोजा प्रभारी पदभार दिलेल्या महिला अधिकाऱ्यावर टाकण्यात आला; मात्र ती कामे करण्यास त्या महिला अधिकाऱ्याने ठाम नकार दिला. नियमबाह्य आणि जबाबदारीशिवाय कामे करण्याचा दबाव सहन न झाल्याने त्या महिला अधिकाऱ्याने कंटाळून अखेर रजेचा मार्ग धरला. हा अध्याय येथेच थांबला नाही.
जिल्हास्तरावर दुय्यम स्तरावर काम करणाऱ्या, नवख्या महिला कर्मचाऱ्याला न सांगता, न विचारता त्या पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला. इतकंच नव्हे, तर त्यांना थेट घरी जाऊन गाडीत बसवून कार्यालयात आणले. कार्यालयात पोहोचताच प्रमुख अधिकाऱ्याने कोट्यवधी रुपयांच्या निविदांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या करून घेतल्या. कुठल्या कागदांवर स्वाक्षरी करतोय, याची साधी माहितीही त्यांना नव्हती. या दबावामुळे त्यांना त्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्याच्या केबिनबाहेर येताच भोवळ आली व त्या कोसळल्या. अखेर ज्या वाहनातून त्यांना कार्यालयात आणलं होतं, त्यातूनच रुग्णालयात दाखल करावे लागले.
-------
आक्रमक भूमिकेचे पडसाद भीतीदायी
आचारसंहितेमुळे कामे खोळंबू नयेत यासाठी त्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्याने ही आक्रमक भूमिका घेतली असली तरी याचे पडसाद भीतीदायक आहेत. तसेच पदोन्नतीने बदलून गेलेल्या त्या अधिकाऱ्याला संबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्याचा अभय होता. त्याला कार्यमुक्त करू नये, अशी मागणी मुलांच्या भविष्याची निगडित असलेल्या विभागाच्या कर्मचारी संघटनेने केली होती. तरीही त्याला तत्काळ कार्यमुक्त केले होते. या सगळ्यातून हा प्रकार मुख्यालयात चर्चेचा विषय ठरला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com