संगमेश्वर -कलाकारांनी कुंचल्यातून सर्वस्व पणाला लावा

संगमेश्वर -कलाकारांनी कुंचल्यातून सर्वस्व पणाला लावा

Published on

rat20p9.jpg
18965
संगमेश्वर ः विद्यार्थ्यांना चित्र काढून दाखवताना विष्णू परीट.
rat20p10.jpg-
18957
निसर्गचित्राविषयी माहिती जाणून घेताना नवोदयचे विद्यार्थी.
rat20p11.jpg-
18958
मंदिराचे रेखाटलेले चित्र.

कलाकारांनी कुंचल्यातून सर्वस्व पणाला लावा
चित्रकार विष्णू परीट; नवोदयच्या विद्यार्थ्यांना निसर्गचित्राचे प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २०ः कलाकार जेव्हा रंगपटलावर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून सर्वस्व पणाला लावतो तेव्हाच उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती होते. जलरंग हाताळणे आव्हानात्मक असले तरी सजग दृष्टी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्यावर प्रभुत्व मिळवता येते, असे आवाहन ख्यातनाम जलरंग निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांनी केले.
राजापूर तालुक्यातील पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक सहल नुकतीच सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयाच्या कला प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आली होती. या दौऱ्यादरम्यान संगमेश्वर येथील जाखमाता मंदिर परिसरात विद्यार्थ्यांसाठी विष्णू परीट यांच्या विशेष निसर्गचित्र प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयाच्या वार्षिक प्रदर्शनाला भेट देऊन तिथल्या कलाकृतींचा आस्वाद घेतला. महाविद्यालयाचे चेअरमन प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य माणिक यादव आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना कलादालनाची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संगमेश्वर येथील व्यापारी पैसाफंड संस्थेचे कलादालन आणि कलावर्गालाही भेट दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे परीट यांनी निरसन केले. मार्गदर्शनाने प्रेरित होऊन परतीच्या प्रवासात नवोदयच्या विद्यार्थ्यांनी जाखमाता मंदिर परिसरात स्वतः बसून ८० निसर्गचित्रे रेखाटली.
या उपक्रमाला जैतापूर हायस्कूलचे कलाशिक्षक कुणकवळेकर, नवोदयचे कलाशिक्षक उन्मेश वेलिंगकर, क्रीडाशिक्षक साहिल यादव, सहशिक्षिका श्रीयांका बोर्डीकर आणि आदिती वाघधरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकल्याबद्दल शिक्षकवृंदाने परीट यांचे आभार मानले.

चौकट
विद्यार्थ्यांनी काढली प्रत्यक्ष चित्रे
जाखमाता मंदिर परिसरात झालेल्या प्रात्यक्षिकात परीट यांनी विद्यार्थ्यांना चित्रासाठी जागेची निवड, कागदाचा पोत, पेन्सिलचा वापर आणि रेखाटनाचे बारकावे समजावून सांगितले. जलरंगात काम करताना रंगांचा ताजेपणा कसा टिकवावा, पाण्याचा वापर आणि रंगांची घनता कशी वाढवावी याचे सखोल मार्गदर्शन त्यांनी केले. केवळ दीड तासात त्यांनी एक उत्कृष्ट निसर्गचित्र साकारून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

Marathi News Esakal
www.esakal.com