टेंबे स्वामी महाराज पालखी सोहळा उत्साहात
swt2910.jpg
20686
सुकळवाड ः येथे टेंबे स्वामी महाराज पालखी सोहळ्यातील एक क्षण.
टेंबे स्वामी महाराज पालखी सोहळा उत्साहात
सुकळवाडमध्ये उत्सव ः दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २९ ः सुकळवाड बाजारपेठ येथील हनुमान मंदिरात श्रीमंत परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज (माणगाव) यांच्या पालखी दर्शन सोहळा व अखंड नामस्मरण कार्यक्रमाचे २९ व ३० ला आयोजन केले आहे. या दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सुकळवाड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
“दिगंबरा दिगंबरा”च्या जयघोषात आज माणगाव येथून टेंबे स्वामी महाराजांच्या पालखीचे सुकळवाड येथे आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. सुकळवाड वरचा नाका येथून ब्राह्मणदेव मंदिर, साई मंदिर, महापुरुष मंदिर येथे दर्शन घेत ही मिरवणूक हनुमान मंदिरापर्यंत आली. नामस्मरणाच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. सकाळी ८.३० वाजता पालखी आगमनानंतर ८.३० ते ११.३० या वेळेत भव्य मिरवणूक पार पडली. दुपारी १२ नंतर पादुका पूजन करून अखंड नामस्मरणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ७ वाजता करुणात्रिपदी आरती, दीपोत्सव व रात्री ९.३० वाजेपर्यंत अखंड नामस्मरणाचा कार्यक्रम झाला. उद्या (ता.३०) पहाटे ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ८ ते १२ या वेळेत पाद्यपूजा व अभिषेक, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हनुमान मंदिर ते सुकळवाड वरचा नाका अशी पालखीची परतीची मिरवणूक निघणार असून, त्यानंतर पालखी माणगावकडे प्रस्थान करणार आहे. या पवित्र पालखी दर्शन सोहळा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन सुकळवाड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

