राज्यमंत्री कदमांविरूध्द सर्वपक्षीय ठाकले उभे

राज्यमंत्री कदमांविरूध्द सर्वपक्षीय ठाकले उभे

Published on

- rat२९p२५.jpg-
२६O२०६७१
दापोली नकाशा
----
दापोलीतील राजकीय समीकरणे बदलली
महायुतीत बिघाडी; राज्यमंत्री कदम यांच्या विरूद्ध सर्वपक्षीय ठाकले उभे, जागा वाटपावरून तिढा
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २९ ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दापोली राज्याचे गृह व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचा बालेकिल्ला असला तरीही महायुतीतील जागावाटपाच्या सूत्रावरून शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत झालेले नाही. याच नाराजीतून महायुतीतील उर्वरित दोन पक्षांकडून ठाकरे गटाशी हातमिळवणी केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे राज्यमंत्री योगेश कदम विरुद्ध सर्व राजकीय पक्ष अशी रंगत आली आहे.
मागील काही वर्षांपासून स्थिर असलेली पक्षीय समीकरणे या निवडणुकीत विस्कळीत झाल्यामुळे विकासाचे मुद्दे प्रचारात मागे पडत आहेत. या संपूर्ण निवडणुकीत जालगाव आणि दाभोळ जिल्हा परिषद गटांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. या दोन्ही ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार असून, भाजपसाठी आपले राजकीय सामर्थ्य शिवसेनेला दाखवून देण्याचे हे मोठे आव्हान आहे. दुसरीकडे तालुक्यात सुरू असलेले उत्खनन प्रकल्प सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात जाणार की काय, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षांनी मंत्री योगेश कदम यांना लक्ष्य करत विशेष रणनीती आखली असून, अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत उमेदवारांनी एकमेकांना दिलेला छुपा पाठिंबा विरोधकांची युती उघड करणारा ठरला आहे.
केळशी गटात शिवसेना, उबाठा, बसपा आणि काँग्रेस अशी चौरंगी लढत होत असून, पालगड आणि हर्णै गटात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा दुरंगी सामना रंगणार आहे. कोळबांद्रे गटात तिरंगी लढतीचे चित्र असून, दाभोळ आणि जालगावमध्ये भाजप-शिवसेना आमनेसामने ठाकले आहेत.
---
चौकट
रिंगणातील उमेदवार असे...
दापोली तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात असून, यात शिवसेना ६, भाजप २, राष्ट्रवादी २, ठाकरे गट २, काँग्रेस २, बसपा १ आणि १ अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ३१ उमेदवार मैदानात असून, शिवसेनेने सर्व १२ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्या पाठोपाठ भाजप ४, राष्ट्रवादी ४, ठाकरे गट ४, बसपा २, अपक्ष ३ तर काँग्रेस व मनसेने प्रत्येकी एका जागेवर उमेदवार दिला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने एकही उमेदवार उभा न करता आपली भूमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे.
-------
‘त्या’ वृत्तानंतर उत्साह हरपला
अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली होती; मात्र २८ रोजी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या बातमीने काही काळ सर्वच राजकीय पक्षांची प्रचार यंत्रणा थंडावली होती. दुपारनंतर नियोजित प्रचार कार्यक्रम पुन्हा सुरू झाले असले तरीही प्रचारात नेहमीचा उत्साह नव्हता.
----
कोट
दापोलीच्या ग्रामीण भागांतील पायाभूत विकासाच्यादृष्टीनेच या निवडणुकीकडे आम्ही पाहत आहोत. खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या असलेल्या निवडणुकीत महायुतीतील इतर घटक पक्षांना दुखावण्याचेच काम येथील नेतृत्वाकडून केले गेले. जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवले जात आहेत. मित्रपक्षांना दुखावण्यावरच भर आहे. त्याचे फलित जनता देईल.

- ऋषिकेश गुजर, तालुकाप्रमुख (ठाकरे शिवसेना)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com