रत्नागिरी- धक्कादायक, जिल्ह्यात ९ महिन्यात ८,५३० सिझेरिअन प्रसुती

रत्नागिरी- धक्कादायक, जिल्ह्यात ९ महिन्यात ८,५३० सिझेरिअन प्रसुती

Published on

रत्नागिरी जिल्ह्यात सिझेरिअनचा वाढते प्रमाण
नऊ महिन्यात ८ हजार ५३ प्रसूती; बदलती जीवनशैली, वाढते वय ठरते प्रमुख कारण
सकाळ वृत्तसेवा
​रत्नागिरी, ता. ३१ : एकेकाळी वैद्यकीय क्षेत्रात अपवादात्मक मानली जाणारी सिझेरिअन (शस्त्रक्रिया) आता रत्नागिरी जिल्ह्यात जणू ‘नॉर्मल’ झाली आहे. गेल्या नऊ महिन्यांतील आकडेवारी पाहता नैसर्गिक प्रसूतीपेक्षा सिझेरिअन प्रसूतीकडे कल वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या एकूण प्रसूतींपैकी ६५ टक्क्यांहून अधिक प्रसूती या शस्त्रक्रियेद्वारे झाल्याची नोंद झाली आहे.
​जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या काळात एकूण १३ हजार ११८ प्रसूती झाल्या. त्यापैकी तब्बल ८ हजार ५३० प्रसूती सिझेरिअन पद्धतीने झाल्या आहेत. विशेष म्हणजे, सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरिअन प्रसूतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त आहे.
​तज्ज्ञांच्या मते, सिझेरिअन वाढण्यामागे केवळ वैद्यकीय आपत्कालीन स्थिती नसून बदललेली जीवनशैली हे मोठे कारण आहे. करिअर आणि इतर कारणांमुळे उशिरा होणारी लग्नं आणि गर्भधारणेमुळे गुंतागुंत वाढते. व्यायामाचा अभाव आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे आईचा रक्तदाब वाढणे किंवा मधुमेह होणे, हे प्रमाण वाढत आहे. बाळाची स्थिती उलटी असणे, गर्भाशयाचे तोंड न उघडणे किंवा बाळाच्या हृदयाचे ठोके अचानक कमी होणे अशी वैद्यकीय कारणे आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मातेने स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
बदलत्या काळानुसार, स्त्रियांमधील आरोग्यसमस्या वाढत आहेत. तरीही, जिथे शक्य आहे तिथे नैसर्गिक प्रसूतीलाच प्राधान्य दिले पाहिजे. सिझेरिअन झाले असल्यास पुढील काही महिने योग्य आहार आणि विश्रांती घेतल्यास माता पुन्हा पूर्णपणे सक्रिय होऊ शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
-----
चौकट...
काय घ्याल काळजी...
* टाक्यांची स्वच्छता ः संसर्ग टाळण्यासाठी टाक्यांची जागा नेहमी कोरडी आणि स्वच्छ ठेवावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ड्रेसिंग करावे.
* शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रथिने आणि फायबरयुक्त सकस आहार घ्यावा.
* पोटाच्या टाक्यांवर ताण पडेल अशी जड कामे किंवा वजन उचलणे टाळावे.
* पूर्ण बेडरेस्ट न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू चालण्यास सुरुवात करावी.

दृष्टिक्षेपात...
* एकूण १३ हजार ११८ प्रसूती
* खासगी रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियांचे प्रमाण अधिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com