परीक्षा केंद्र बंद करायचे असल्यास नोटीस द्यावी
परीक्षा केंद्र बंद करायचे
असल्यास नोटीस द्यावी
राजेश क्षीरसागर ; कॉपी आढळल्यास तत्काळ चौकशी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : कॉपी प्रकार आढळल्यास तत्काळ, न्याय चौकशी करावी. दोषी पर्यवेक्षक, निरीक्षक, केंद्रप्रमुख यांची जबाबदारी निश्चित करावी. आवश्यकतेनुसार शिस्तभंग कारवाई करावी. सेवा पुस्तकामध्ये नोंदी कराव्यात. भविष्यात कोणतेही परीक्षा केंद्र बंद करावयाचे असल्यास परीक्षा केंद्रास सविस्तर कारणे दाखवा नोटीस द्यावी, अशा सूचना निर्गमित केल्या आहेत, अशी माहिती कोकण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य मंडळाने परीक्षा केंद्रांनी घ्यायची खबरदारी, प्रशासनास निर्देश आणि परीक्षा संचालनाबाबत परिपत्रकाद्वारे सविस्तर सूचना निर्गमित केल्याची माहिती कोकण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. कोकण मंडळात कॉपीमुक्ततेसाठी यापूर्वी प्रयत्न केल्यामुळे कोकणात कॉपीचे प्रमाण नगण्य आहे. मात्र तरीही सूचना दिल्या आहेत.
प्रत्येक परीक्षा केंद्राने स्वत:च्या खर्चाने व केंद्रप्रमुखांच्या समन्वयाने पुढील किमान उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रवेश व निर्गमन नियंत्रित ठेवणे, योग्य बैठक व्यवस्था व पुरेसे अंतर ठेवणे, प्रतिबंधित वस्तू व परीक्षा सूचना ठळक ठिकाणी लावणे, अनधिकृत व्यक्तींना प्रवेश रोखण्यासाठी पुरेसे सुरक्षा रक्षक नेमणे, भेटीदरम्यान नोंद वही व घटना नोंद वही ठेवणे, तपासणीसाठी अडथळामुक्त व नियंत्रित वातावरण उपलब्ध करून देणे, यांचा समावेश आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्र/संस्थांकडून संस्थेच्या लेटरहेडवर, संस्थाप्रमुखांच्या स्वाक्षरीसह काही बाबी नमूद करणारे हमी पत्र मंडळाकडे सादर करायचे आहे. यानुसार संस्थेत होणाऱ्या सर्व परीक्षा मुक्त, न्याय्य व पारदर्शक पद्धतीने घेतल्या जातील. कॉपी, गैरप्रकार, प्रतिबंधित साहित्य, तोतयागिरी किंवा अनियमितता सहन केली जाणार नाही.
चौकट
दोषींवर शिस्तभंग कारवाई
परीक्षेसाठी नेमलेले पर्यवेक्षक व निरीक्षक पात्र, प्रशिक्षित व संवेदनशील असतील. परीक्षेपूर्वी अनिवार्य प्रशिक्षण सत्र घेतले जाईल. केंद्रप्रमुखास सर्व नियमपालनासाठी थेट जबाबदार धरण्यात येईल. तसेच कोणतीही अनियमितता तत्काळ नोंदविण्यात येईल. दोषी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

