‘डस केंद्रा’मुळे नवी वाणे प्रकाशात

‘डस केंद्रा’मुळे नवी वाणे प्रकाशात

Published on

21635
संग्रहित

‘डस केंद्रा’मुळे नवी वाणे प्रकाशात

मुळदेतील संशोधन; सिंधुदुर्गातील चार जातींना राष्ट्रीय मानांकन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयात कार्यान्वित डस चाचणी केंद्राच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील विविध पिकांच्या चार जातींना राष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळाले आहे. याशिवाय रायगडमधील तीन वाणांचाही सन्मान झाला आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वनस्पती जाती व शेतकरी अधिकार प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील विविध शेतकऱ्यांकडे असलेल्या जायफळ आणि कोकम या पिकांतील तसेच इतर पिकांतील नावीन्यपूर्ण जातीची नोंदणी करण्यासाठी ‘डस चाचणी केंद्र’ मुळदे येथे कार्यान्वित आहे. या प्रकल्पांतर्गत यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ नवीन वाणांना नावीन्यतेसाठी राष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळाले आहे. यामध्ये अच्युत तेंडोलकर (तेंडोली, कुडाळ) यांच्या बागेतील जायफळाच्या दोन विशिष्ट वाणांना ‘तेंडोली समर्थ १’ आणि ‘तेंडोली समर्थ २’ असे राष्ट्रीय स्तरावर नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. प्रगतशील शेतकरी रघुनाथ नाईक (आरोस-दांडेली, सावंतवाडी) यांच्या बागेतील नावीन्यपूर्ण जायफळाच्या वाणाला ‘गीतारोझ’ या नावाने मानांकन मिळाले असून त्याचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. मालवण कुंभारमाठ येथील शेतकरी डॉ. उत्तम फोंडेकर यांच्या लालसर असणाऱ्या शेवग्याची ‘सिंधुदुर्ग कुंभारमाठ उत्तम’ अशा नावाने नोंदणी झाली आहे. या केंद्रामार्फत रायगड जिल्ह्यातील दिवेआगर भागातील तीन शेतकऱ्यांना कोकम या पिकातील त्यांच्याकडे असलेल्या तीन वाणांना ‘अमेय कोकम’, ‘शांभवी कोकम’ आणि ‘वैष्णवी कोकम’ या नावांनी राष्ट्रीय स्तरावर नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. रत्नागिरीतील इतर दोन आणि रायगड जिल्ह्यातील तीन जायफळाच्या झाडांना नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे सर्व वाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून जायफळ आणि कोकम या पिकाखालील क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. सर्व शेतकऱ्यांना नोंदणी व इतर सहकार्य, मार्गदर्शन उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. महेश शेडगे, सहप्रकल्प प्रमुख डॉ. जया वाघ, वरिष्ठ संशोधन छात्र हर्षद नाईक आणि यंग प्रोफेशनल सुषमा पालव यांनी केली आहे.
हे केंद्र उद्यानविद्या महाविद्यालय येथे सुरू असून यात शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन, प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्याकडे असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण वाण तपासले जातात. त्यांची निरीक्षणे घेऊन तसा अहवाल वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार प्राधिकरण, नवी दिल्ली येथे पाठविला जातो. त्यानंतर त्यांचा सखोल अभ्यास करूनच मग नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. संबंधित शेतकरी किंवा शेतकरी समूह त्यासाठी अर्ज करू शकतात. या अर्जात त्यांच्याकडील वाणांची सखोल माहिती दिलेली असते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या वाणांची नोंदणी वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे झाल्यावर अभ्यासाअंती नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते.
................
शेतकऱ्यांनी जुन्या व नावीन्यपूर्ण वाणांची माहिती देऊन त्याची नोंदणी केल्यास त्या पिकाखालील क्षेत्र आणि उत्पन्न वाढेल. तसेच शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदाही होऊ शकतो व तो आपल्या शेतकऱ्यांनी करून घेणे गरजेचे आहे. याबाबत अधिक माहिती व प्रक्रिया उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील डस चाचणी केंद्रामार्फत मोफत दिली जाते आणि प्रक्रिया पूर्ण करण्यास सहकार्य केले जाते.
- डॉ. विजय दळवी, अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com