‘सह्याद्री’तर्फे १२ पासून दापोलीत शैक्षणिक सहल
‘सह्याद्री’तर्फे १२ पासून
दापोलीत शैक्षणिक सहल
सावंतवाडी ः सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्था आणि सावंतवाडी पूर्व विभाग नारळ उत्पादक समूह यांच्या वतीने १२ आणि १३ फेब्रुवारीला कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे दोन दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही सहल १२ ला सकाळी ९ वाजता सावंतवाडीतून निघेल. वाटेत पावस, भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्र, गणपतीपुळे आणि परशुराम मंदिर पाहत सहल दापोलीला पोहोचेल. तसेच १३ रोजी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून नारळावरील कीड, रोग आणि नवीन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन दिले जाईल. वर्दे येथील कृषी पर्यटन प्रकल्पालाही भेट दिली जाणार आहे. इच्छुकांनी ८ फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी धर्माजी गावडे, भरत गावडे, प्रमोद सावंत किंवा मिलिंद परब यांच्याशी संपर्क साधावा, असे संस्थाध्यक्ष रामानंद शिरोडकर यांनी कळवले आहे.
..................
आरोंद्यात गुरुवारी
पादुकांचे दर्शन
आरोंदा ः श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथून प्रतिवर्षाप्रमाणे श्री स्वामी समर्थ पालखी पादुकांचे गुरुवारी (ता. ५) सायंकाळी ५ वाजता आरोंदा येथे आगमन होणार आहे. कस्टम ऑफिस खासकीलवाडा येथे आगमन व स्वागत सोहळा होणार आहे. श्री देवी सातेरी भद्रकाली देऊळवाडा मार्गे मिरवणूक काढून श्री देव कुळकार देवस्थान मंदिर (इनामतबाग) पीरवाडी येथे स्थानापन्न होणार आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता सामूहिक नामस्मरण, आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वाजता श्री नारायण देव महिला भजन मंडळ, हरमल (गोवा) यांचे भजन, रात्री ८ वाजता आरती, पुष्पांजली, महाप्रसाद (भंडारा), ९:३० वाजता भजन, (आरोंदा संयुक्त भजन मंडळ), शुक्रवारी (ता. ६) सकाळी ४.३० वाजता काकड आरती (श्री देवी माऊली वारकरी भजनी मंडळ केरवाडा), ५.३० वाजता सामूहिक दुग्धाभिषेक होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आरोंदा यांनी केले आहे.
...................
दळवींच्या साहित्यावर
हैदराबाद येथे उहापोह
बांदा ः हैदराबाद येथील १०३ वर्षांची वैचारिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या ऐतिहासिक वास्तूत ''जयवंत दळवी-साहित्य, अनुवाद आणि प्रकारांतर'' या विषयावरील अखिल भारतीय बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र दीड दिवस विचारमंथनाच्या वातावरणात पार पडले. राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या पुरस्कृत आणि मराठी ग्रंथ संग्रहालय, हैदराबाद आयोजित या साहित्य जागराने मराठी साहित्यप्रेमींसाठी जणू बौद्धिक पर्वणीच ठरली. या चर्चासत्रात डॉ. जयंत धुपकर, डॉ. महेश शहा, अध्यक्ष विवेक देशपांडे, डॉ. वसुधा सहस्रबुद्धे, डॉ. निर्मोही फडके, डॉ. विजय पांढरीपांडे आदींनी सहभाग घेतला. हैदराबादमध्ये मराठी भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक ओळख जपणाऱ्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या या उपक्रमाचे साहित्यवर्तुळात विशेष कौतुक झाले.
----
पथनाट्य, गायनातून
मतदानाबाबत जागृती
सावंतवाडी ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेला रत्नागिरीत वेग आला असून, मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दापोली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने ‘स्वीप मतदार जनजागृती कलापथक’ स्थापन केले आहे. या कलापथकाच्या माध्यमातून दापोली तालुक्यातील ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य व मतदार जागृतीपर गीतगायनाचे प्रभावी सादरीकरण करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा असून, मतदानाचा हक्क बजावण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व, लोकशाही मुल्ये व निष्पक्ष मतदानाचा संदेश देण्यात येत असल्याने नागरिकांकडून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

