‘सामाजिकीकरण’ एकटेपणावर ‘रामबाण’
21763
‘सामाजिकीकरण’ एकटेपणावर ‘रामबाण’
निर्मला सामंत-प्रभावळकर ः कुडाळात ज्येष्ठ नागरिक दिनी चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः ‘‘सामाजिकीकरण हा वृद्धापकाळातील एकटेपणावरील रामबाण उपाय आहे. समाजात मिसळल्याने एकटेपणा दूर होतो. नैराश्य येत नाही. माणसांमध्ये मिसळा, त्यांच्याशी संवाद साधा. आपण जे करतो त्यात आनंद मिळत असेल तर ती गोष्ट करत राहा,’’ असे प्रतिपादन मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी केले.
येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत आयोजित ‘नातवंडे-आजोबा आजी आणि नातेसंबंध’ विषयावर चर्चासत्रामध्ये त्या बोलत होत्या. केंद्रीय मंत्रालयाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण खात्यांतर्गत आंतरपिढी बंध (इंटरजनरेशनल बॉण्डिंग) उपक्रमांतर्गत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
व्यासपीठावर निवृत्त पोलिस उपाधीक्षक माधव प्रभूखानोलकर, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहिनी वजराटकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, प्रा. नंदिनी देशमुख, सीईओ अमृता गाळवणकर, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रा. कल्पना भंडारी, कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला रात्र महाविद्यालयाचे प्रा. अरुण मर्गज, संस्था सल्लागार पल्लवी कामत उपस्थित होत्या. डॉ. वजराटकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निबंध व चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. अश्विनी परब यांनी सूत्रसंचालन केले. पल्लवी कामत यांनी आभार मानले.
---
‘वृद्धाश्रमांची वाढती संख्या चिंतेची’
निर्मला सामंत म्हणाल्या, ‘‘वृद्धाश्रमांची वाढत जाणारी संख्या फार चिंतेची गोष्ट आहे. आजच्या पिढीने प्रचंड अनुभवाची शिदोरी असलेल्या ज्येष्ठांना समजून घ्यावे. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आपल्या आनंदात सहभागी घ्या. त्यांना आत्मिक बळ द्या. भारत हा तरुणांचा देश आहे, तो वृद्धांचा बनवू नका. ज्येष्ठांना जपा, म्हणजे देश तरुणांचा राहील. त्यांच्याशी संवाद साधा. आजोबा-आजी म्हणजे नातवांची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ठेव्याची बँक आहे. ज्येष्ठांप्रती आपुलकीची भावना तुमच्या कृती-उक्तीतून दिसू द्या.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

