राणेंचा शब्द न पाळण्याची 
हिंमत नको ः नीतेश राणे

राणेंचा शब्द न पाळण्याची हिंमत नको ः नीतेश राणे

Published on

21813

राणेंचा शब्द न पाळण्याची
हिंमत नको ः नीतेश राणे

महायुतीच्या प्रचार सभेत अपक्षांना इशारा

म्हापण, ता. ३ ः नारायण राणेंचा शब्द न पाळण्याची हिंमत कोणी करू नये, असा इशारा पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हा परिषद मतदारसंघात आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत अपक्षांना दिला.
म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारांसाठी महायुतीची संयुक्त जाहीर प्रचार सभा परुळे येथील वराठी मंगल कार्यालयात काल (ता. २) उशिरा झाली. यावेळी श्री. राणे म्हणाले, ‘‘खासदार राणे यांनी महायुतीचा फॉर्म्युला यापूर्वीच जाहीर केला. नारायण राणेंचा शब्द हा अंतिम असून त्यांचा शब्द मोडण्याची वळवळ कोणी करू नये. राणे यांनी महायुती केली आहे, त्यात कोणताही संभ्रम नको. जाणूनबुजून कोणी वळवळ करण्याचा प्रयत्न करू नये. महायुतीला पोषक वातावरण असून महायुतीचा अधिकृत उमेदवार सोडून कोणी प्रचार केल्यास त्याचा सामना थेट माझ्यासोबत असेल. सर्व पदाधिकाऱ्यांनी अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी राहिले पाहिजे. तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ. महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताधिक्याने निवडून द्या. विकासाची जबाबदारी माझी असेल. या मतदारसंघात कोणताही संभ्रम नाही. महायुतीचे परुळे पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार सचिन देसाई हेच आहेत. हाच संभ्रम दूर करण्यासाठी मी मुद्दाम आलो आहे.’’
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री तथा शिवसेना आमदार केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा संघटक सचिन वालावलकर, भाजपचे तालुकाध्यक्ष पप्पू परब, म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघाच्या शिवसेना उमेदवार यज्ञा साळगावकर, पंचायत समितीचे भाजपा उमेदवार विष्णू उर्फ आपा फणसेकर, परुळे पंचायत समितीचे शिवसेना उमेदवार सचिन देसाई, भोगवे माजी सरपंच महेश सामंत, माजी पंचायत समिती सदस्या प्रणाली बंगे, म्हापण उपसरपंच सुरेश ठाकूर, भोगवे सरपंच वायंगणकर, निवती सरपंच अवधूत रेगे तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.................
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचे
श्रेय प्रभूंचेच ः विनायक राऊत

पालकमंत्री राणे यांच्यावर टीका

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३ ः वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी अजूनही केंद्रीय अर्थसंकल्पात अधिकृतपणे तरतूद झालेली नाही; मात्र तरीही या नियोजित रेल्वेमार्गाचे संपूर्ण श्रेय तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचेच आहे. त्यांचे नाव घेण्याचे सौजन्य देखील पालकमंत्री नीतेश राणेंकडे नाही, अशी टीका माजी खासदार तथा ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी येथे केली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने श्री. राऊत सिंधुदुर्गात आहेत. त्यांनी आज येथील ठाकरे शिवसेनेच्या तालुका संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख नंदू शिंदे, संदीप सरवणकर, संतोष पाटील, गुलझार काझी आदी उपस्थित होते.
श्री. राऊत म्हणाले, ‘‘नियोजित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी मी सतत पाठपुरावा केला. तत्कालीन रेल्वेमंत्री प्रभू यांनी रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे या प्रकल्पाचे श्रेय त्यांचेच आहे, परंतु त्यांचा सोयीस्कर विसर पालकमंत्री राणेंना पडल्याचे दिसून आले. त्यांनी रेल्वेमार्गाकरिता ३ हजार २४४ कोटी निधीची तरतूद झाली, असे जाहीर केले, परंतु अर्थसंकल्पातील तरतुदीनंतर त्याची पिंगबुकमध्ये नोंद होणे आवश्यक असते. ते होण्याअगोदरच पालकमंत्री राणे आपणच सर्व मंजूर केल्याचा कांगावा करीत आहेत; मात्र ज्या प्रभूंनी हे सर्व केले, त्यांचे नाव घेण्याचे देखील त्यांनी टाळले, यासारखे दुसरे दुर्दैव नाही.’’
ते म्हणाले, ‘‘कणकवली विधानसभा मतदारसंघात सत्तेच्या जोरावर आमच्या कार्यकर्त्यांना धमकावून काही जागांची निवडणूक बिनविरोध केली. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर निवडणूक लढवून जिंकावे. ‘बिनविरोध’ हे शेळपटाचे कारनामे आहेत. कणकवलीतील मतदारांनी त्यांना जागा दाखविली. विकासनिधी हा शासनाचा असतो, तो कुणीही आपल्या खिशातून देत नाही. त्यामुळे विरोधी पक्षातील सदस्यांना निधी देणार नाही, या वक्तव्याविरोधात यापूर्वी मी राज्यपालांकडे तक्रार केली होती. यापुढे देखील जर त्यांनी अशा प्रकारे निधी दिला नाही तर न्यायालयात दाद मागणार आहोत.’’
श्री. राऊत म्हणाले, ‘‘सध्याच्या निवडणुकीची पध्दत पाहता केवळ धनदांड्यांनीच निवडणुका लढवाव्या, अशी स्थिती त्यांनी निर्माण केली आहे. उमेद्वारांना वेगवेगळी आमिषे दाखवून माघार घ्यायला लावली. त्यामुळे भविष्यात आम्ही विचारांवर आधारीत कार्यकर्ते तयार करून त्यांना उत्तर देऊ.’’
दरम्यान, युवा सेना अध्यक्ष नाईक म्हणाले, ‘‘कणकवली विधानसभा मतदारसंघातील काही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातील मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचे पाप केले आहे. लोकशाही संपविण्याचे हे षड्यंत्र आहे. त्याकरिता अनेक फंडे वापरले गेले, तरी देखील कोणत्याही अमिषाला बळी न पडता जे निवडणूक लढवित आहेत, ते लोकशाहीचे खरे हिरो आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com