- भांबेड, आसगे गटात हायव्होल्टेज लढत
भांबेड, आसगे गटात लक्षवेधी लढती
लांजा तालुका; बड्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचा कस
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ४ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत लांजा तालुक्यात खरी लढत शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना यांच्यातच होणार आहे. चार जिल्हा परिषद गटापैकी भांबेड आणि आसगे येथील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. या ठिकाणी शिवसेनेच्या बड्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे तर भांबेड प्रभानवल्ली, खानवली, गवाणे व वेरवली बुद्रुक या पंचायत समिती गणातील निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.
चार गट आणि आठ गणांवर वरचष्मा राखण्यासाठी विद्यमान आमदारांसह स्थानिक नेतृत्वाचा कस लागणार आहे. शिवसेनेकडून आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची फौज प्रचारात उतरलेली आहे. मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात पडझड झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी ही निवडणूक ‘करो या मरो’ अशी ठरणार आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर तालुका आणि शहर पातळीवरील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांची बाजू भक्कम दिसत आहे. तरीही ग्रामीण भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मानणारा वर्ग सक्रिय आहे. त्यात ठाकरे शिवसेनेने जिल्हाप्रमुखपदाची धुरा लांजा येथील दत्ता कदम यांच्याकडे दिल्यामुळे त्यांची प्रतिष्ठाही पणाला लागलेली आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते गेले तरीही मतदार अजूनही शिवसेना उबाठा पक्षाच्या पाठीशी आहे.
लांजा नगरपंचायत निवडणुकीत शिंदे शिवसेनेने दमदार यश मिळवल्यानंतर आमदार सामंत यांनी आपले संपूर्ण लक्ष हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर केंद्रित केले आहे. या निवडणुकीत भांबेड गटात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी विनय गांगण यांची पत्नी माजी सरपंच विनया गांगण रिंगणात असून, त्यांच्या विरोधात उबाठाकडून महिला जिल्हा संघटक उल्का विश्वासराव यांनी आपली कन्या अचला विश्वासराव यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या लढतीचे महत्व वाढलेले आहे तसेच आसगे गटात माजी सदस्य गणेश लाखण यांची पत्नी मनीषा लाखण शिंदे सेनेकडून तर उबाठाकडून युवासेनेचे पदाधिकारी अभिजित राजेशिर्के यांची पत्नी अनन्या राजेशिर्के रिंगणात असल्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. गवाणे गटातील तिरंगी लढत होणार असून, शिवसेना, शिवसेना उबाठा विरुद्ध बसपाचे उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे संतोष रेवाळे विरुद्ध शिवसेना उबाठाच्या चेतन दळवी यांच्यात होणार आहे. साटवली गटातून माजी पंचायत समिती सभापती लीला घडशी या शिवसेनेकडून निवडणूक लढवत असून, त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसकडून मनीषा जाधव उभ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

