बावनदीवरील धरणाचे काम असमाधानी
देवरूख पाणीपुरवठा योजनेवर ‘मनसे’चा आक्षेप
नगरसेवकांकडून प्रत्यक्ष पाहणी ; बावनदी धरणाच्या कामाच्या दर्जाबाबत असमाधान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः देवरूख शहराला चोवीस तास व सातही दिवस अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर झालेल्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत बावनदी पात्रात उभारण्यात येत असलेल्या धरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी पाहणी केली. या कामाबाबत असमाधान व्यक्त केले आहे. सहा कोटी रुपयांची ही योजना काम पूर्ण होईपर्यंत आठ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
देवरूख शहरासाठी चोवीस तास पाणीपुरवठा ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, तिला मंजुरी व निधी उपलब्ध झाला आहे; मात्र, शासनाकडून दिल्या जाणाऱ्या निधीतून होणारे काम दर्जेदार, टिकाऊ व सुरक्षित असणे तितकेच आवश्यक असल्याचा नागरिकांचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नगरसेवक अनुराग कोचिरकर, अक्षय झेपले, सिद्धेश वेल्हाळ, सागर संसारे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते अजित गवाणकर व इस्तियाक कापडी यांनी संयुक्तपणे धरणाच्या कामाची पाहणी केली. या कामाची नगरपंचायतीकडून वेळोवेळी पाहणी करणे आवश्यक असल्याचे नगरसेवकांचे मत आहे. या कामाचा दर्जा पूर्णतः कामगारांवर अवलंबून असून त्या दृष्टीने नगरपंचायत प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
बावनदी ही तालुक्यातील मोठी नदी असून, पावसाळ्यात तिला प्रचंड पूर येतो. यापूर्वी या नदीने अनेक लोखंडी साकव वाहून गेले आहेत. निवधे, कासारकोळवण व परशुराम एरंडेवाडी परिसराचा संपर्क तुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा धोकादायक नदीवर धरण उभारले जात असल्यामुळे त्याचे बांधकाम मजबूत व सुरक्षित असावे, असे नगरसेवकांचे मत आहे.
-------
चौकट
आमदार निकम, पालकमंत्र्यांनी पाहणी करावी
आमदार शेखर निकम यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांनी कामाची पाहणी करावी तसेच पालकमंत्र्यांनीही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. काम दर्जात्मक पद्धतीने होत नसेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करून शासनाच्या व जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवावा, योजना जैसे थे स्थितीत राहू नये, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

