सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न

सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न

Published on

swt415.jpg
22155
आडेली ः येथील महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना पालकमंत्री नीतेश राणे. बाजूला दीपक केसरकर, मनीष दळवी व इतर मान्यवर.

विरोधकांकडे विकासाचा मुद्दाच नाही
नीतेश राणेः आडेलीत महायुतीची प्रचार सभा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ५ः खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लढवीत आहोत. आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ पुढील कालावधीत रोजगार, पर्यटनदृष्टीने विकसित करावयाचा आहे. विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्याने महायुतीला साथ द्या. पालकमंत्री या नात्याने आडेली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईन, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांनी आडेली येथे दिली.
तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ आडेली श्री देव चव्हाटा मंदिर नजीक मंगळवारी (ता. ३) उशिरा महायुतीची प्रचार सभा झाली. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शरद चव्हाण, प्रभाकर सावंत, मनीष दळवी, जयवंत धर्णे, दादा धर्णे, एम. के. गावडे, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, सचिन वालावलकर, विष्णू उर्फ पप्पू परब, सचिन देसाई, समिधा नाईक, नितीन मांजरेकर, शीतल राऊत, आडेली सरपंच यशस्वी कोंडसकर, मठ सरपंच रुपाली नाईक, दाभोली सरपंच उदय गोवेकर, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, निरीक्षक व नगरसेविका शीतल आंगचेकर व संदेश निकम, सुमन निकम, सचिन शेट्ये, गौरी माईणकर, गौरी मराठे, आडेली उपसरपंच परेश हळणकर, दाभोली उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, श्री. आडेलकर, सुधीर मुंडये, विष्णू कोंडसकर, प्रशांत प्रभुखानोलकर, हर्षद साळगावकर आदी उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘आडेली हा निसर्गसंपन्न मतदारसंघ आहे. या भागाला समुद्रकिनारा लाभला आहे. जे महत्त्व तारकर्लीचे आहे, तसेच महत्त्व उभादांडा, वायंगणीचे आहे. त्यामुळे येथे विकासाची क्षमता आहे. या मतदारसंघाचे सर्व सरपंच युतीचे आहेत. त्यामुळे येथील तिन्ही उमेदवारांना साथ द्या. तुमच्या विकासाची जबाबदारी आमची राहील.’’ सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले. नितीन मांजरेकर यांनी आभार मानले.
...................
सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न
सुशांत नाईक : ठाकरे शिवसेनेच्या तालुका संपर्क कार्यालयात संवाद
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ५ ः लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक होणे आवश्यक आहे, परंतु सत्ताधारी निवडणूक होऊच नये म्हणन साम, दाम, दंड भेदाचा वापर करीत असून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ठाकरे युवा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी येथे केला.
येथील ठाकरे शिवसेनेच्या तालुका संपर्क कार्यालयात श्री. नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख नंदू शिंदे, संदीप सरवणकर, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
श्री. नाईक म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सत्ताधारी बिनविरोध निवडून आलेले उमेदवार आपल्या विकासामुळे आल्याचा आभास निर्माण करीत आहे, परंतु प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी कोणकोणते पर्याय अवलंबिले, हे सर्वांना माहीत आहेत. कोणतीही संधी त्यांनी सोडली नाही. साम, दाम, दंड, भेदचा वापर त्यांनी सत्तेच्या जोरावर केला. त्यामुळेच बिनविरोध सदस्य निवडून आले आहेत. पाच वर्षांनी निवडणुका होत असतात. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक पक्षाचा उमेद्वार प्रचाराच्या निमित्ताने मतदारांपर्यत जात असतो. त्यामुळे मतदारांचे प्रश्न, समस्या त्यांना जाणून घेता येतात. निवडून आलेल्या सदस्यांना पुढील पाच वर्षांत त्या प्रश्नांची सोडवणूक करताना कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, हे समजते. मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता येतो, परंतु हा हक्कच सत्ताधाऱ्यांनी हिरावून घेण्याचे काम केले आहे. लोकशाही संपविण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असून हे सर्व लोकशाहीला मारक आहे.’’
ते म्हणाले, ‘‘जर सत्ताधाऱ्यांनी विकास केला असेल तर ते निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी का घाबरत आहेत, हा प्रश्न आहे; मात्र या सर्व दबावाच्या राजकारणात देखील अनेक उमेद्‌वार निवडणूक रिंगणात उतरून सत्ताधाऱ्यांशी दोन हात करीत आहेत. ते खऱ्या अर्थाने लोकशाहीचे हिरो आहेत. लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम ते करीत आहेत. जनतेने त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून निर्भयपणे मतदान करावे आणि लोकशाही वाचवावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com